Join us  

ते एकटे राहूच शकत नाहीत! विराटने सांगितली भारतीय संघातील सीता आणि गीताची जोडी

shubman gill and ishan kishan: विराट कोहलीने शुबमन गिल आणि इशान किशन यांच्याबद्दल एक मिश्किल टिप्पणी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 4:15 PM

Open in App

Virat Kohli: सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. भारतीय संघातील खेळाडू या लीगमध्ये व्यग्र आहेत. आयपीएल २०२४ नंतर लगेचच जून महिन्यात ट्वेंटी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून एकटा किल्ला लढवत असल्याचे दिसते. विराट वगळता आरसीबीच्या इतर एकाही शिलेदाराला आपली छाप सोडता आली नाही. सांघिक खेळीच्या अपवादामुळे आरसीबीला सतत पराभवाचा सामना करावा लागत आहे. 

विराट नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतो. पण, आता किंग कोहली त्याच्या एका विधानामुळे चर्चेत आला आहे. त्याने भारतीय संघाबद्दल भाष्य करताना शुबमन गिल आणि इशान किशन यांच्याबद्दल एक मिश्किल विधान केले. शुबमन आणि इशान यांची मैत्री जगजाहीर आहे. त्यांच्याबद्दल बोलताना विराटने सांगितले की, ते दोघेही खूप विनोदी शैलीचे आहेत. ते म्हणजे सीता आणि गीता अशीच त्यांची जोडी आहे. त्यांच्याबद्दल मी फार काही सांगू शकत नाही. पण, ते दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. आम्ही जेवायला गेलो तरी ते दोघे एकत्रच दिसतात. कुठेही बोलताना, चर्चा करताना आणि फिरताना ते एकत्रच असतात. त्यांना मी एकटे कधीच पाहिले नाही, त्यांची चांगली मैत्री आहे. विराट 'पुमा'च्या कार्यक्रमात बोलत होता. 

यावेळी विराटने गौतम गंभीरबद्दलही भाष्य केले. तो म्हणाला की, माझ्या वागण्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. मी नवीन-उल-हक आणि गौतम गंभीर यांना मिठी मारल्याने लोकांच्या मनोरंजनाला ब्रेक लागला. त्यांना आता काहीच मसाला मिळत नाही. खरं तर मागील आयपीएल हंगामात गंभीर आणि अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक यांच्याशी विराटचा वाद झाला होता. पण, आता या दोघांशीही विराटने गळाभेट घेतल्याने वादाला पूर्णविराम मिळाला. यावरून काही चाहते भन्नाट मीम्स व्हायरल करत आहेत.

दरम्यान, फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीचा संघ यंदा देखील संघर्ष करत आहे. विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये असला तरी सांघिक खेळीचा अपवाद आरसीबीला पराभवाच्या दिशेने नेत आहे. विराट ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असून त्याने आतापर्यंत ३१६ धावा केल्या आहेत. केकेआरविरूद्धच्या सामन्यात त्याने ८३ धावांची अप्रतिम खेळी केली पण तरीदेखील आरसीबीला पराभव पत्करावा लागला. खराब गोलंदाजी संघाची डोकेदुखी वाढवत आहेत. 

टॅग्स :विराट कोहलीइशान किशनशुभमन गिलभारतीय क्रिकेट संघ