मुंबई: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या क्रिकेटपासून दूर आहे. अलीकडेच पार पडलेल्या ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर विराटला विश्रांती देण्यात आली आहे. आता तो ४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बांगलादेशविरूद्धच्या वनडे मालिकेचा हिस्सा असणार आहे. या मालिकेला सुरूवात होण्याआधीच विराटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. विराट कोहली सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. मात्र आज त्याने एक व्हिडीओ स्टोरीवर ठेवून सर्वांनाच चकीत केले आहे.
किंग कोहलीने केला 'नकली विराट'चा पर्दाफाश
विराट कोहलीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये एक नकली विराट कोहली मुंबईच्या रस्त्यावर PUMAचे प्रोडक्ट विकताना दिसत आहे. यामुळे विराट कोहली चांगलाच संतापला आणि त्याने या व्यक्तीचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, "हॅलो PUMA इंडिया, कोणीतरी माझी कॉपी करत आहे आणि लिंक रोड, मुंबईवर PUMAचे प्रोडक्ट विकत आहे. या बाबतीत तुम्ही काही करू शकता का?".
विराट कोहलीने शेअर केलेल्या या स्टोरीमध्ये तुम्ही पाहू शकता की, विराटसारखा दिसणारा हा व्यक्ती अगदी त्याच्यासारखाच एक्सप्रेशन देत आहे आणि लोक त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठीही येत आहेत. सध्या हा व्हिडीओ पाहून चाहते देखील संतापले असून या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. विराट आगामी बांगलादेशविरूद्धच्या वनडे मालिकेतून खेळताना दिसणार आहे. ही मालिका ४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
बांगलादेशविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल.
भारताच्या बांगलादेश दौऱ्याचे वेळापत्रक
- 1 डिसेंबर - भारतीय संघ बांगलादेशला पोहचेल
- 4 डिसेंबर - पहिला वनडे सामना, ढाका
- 7 डिसेंबर - दुसरा वनडे सामना, ढाका
- 10 डिसेंबर - तिसरा वनडे सामना, ढाका
- 14-18 डिसेंबर - पहिला कसोटी सामना, चटगाव
- 22-26 डिसेंबर - दुसरा कसोटी सामना, ढाका
- 27 डिसेंबर - भारतीय संघ मायदेशी परतण्यासाठी रवाना होईल
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"