Join us  

विराटचा सहा महिन्यांपासून BCCI सोबत सुरू होता वाद!; रोहितची उचलबांगडी हवी होती

विराट कोहली हा रोहित शर्माला वन डे संघाच्या उपकर्णधारपदावरुन दूर करू इच्छित होता. तसा प्रस्ताव घेऊन तो निवडकर्त्यांकडेही गेला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 8:19 AM

Open in App

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर:विराट कोहली याने टी-२० प्रकारात भारतीय संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा गुरुवारी केली. पण, यामागे गेल्या सहा महिन्यातील बीसीसीआयसोबत सुरू असलेल्या वादाची पार्श्वभूमी आहे. विराटच्या घोषणेमुळे चाहत्यांना धक्का बसला असेल. मात्र, हा निर्णय तडकाफडकी घेण्यात आलेला नाही. कोहलीने पद सोडण्याची तयारी मागच्या सहा महिन्यांपासून सुरू केल्याची आतली बातमी आता पुढे येत आहे.

कामाचे व्यवस्थापन करण्याचे कारण देत विराटने टी-२० विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले. त्याआधी जागतिक कसोटी मालिकेच्या अंतिम सामन्यानंतरच फलंदाजीवर झालेला परिणाम आणि सुमार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर तो टी-२०चे कर्णधारपद सोडेल, अशी कुजबुज सुरू झाली होती. निवड समितीमधील नवीन सदस्य आणि प्रशिक्षणातील बदलांमुळे विराटपुढील आव्हाने वाढली होती. 

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध झालेल्या एक दिवसीय मालिकेसाठी कोहलीला शिखर धवन संघात हवा होता. बीसीसीआय निवड समितीचे मत मात्र वेगळे होते. धवनला घेण्यावरुन बीसीसीआय आणि विराटमध्ये वाद झाला. धवनऐवजी नव्या दमाच्या सलामीवीराला संघात संधी देण्याचा निवडकर्त्यांचा विचार होता. विराटला शिखर धवन सलामीवीर म्हणून हवा होता. अखेर धवनचीच निवड करण्यात आली. 

या संघर्षानंतर निवडकर्त्यांनी विराटपुढे काहीशी माघार घेतली. श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचा कर्णधार म्हणून धवनला पाठवले. मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध वन डे मालिकेसाठी संघ जाहीर करण्यासाठी पाच दिवस उशिर झाला. कर्णधार आणि निवड समितीमध्ये कुठलाही वाद नाही, हे यानिमित्ताने बोर्डाने भासविण्याचा प्रयत्न केला, तरीही कोहली सर्वांवर वरचढ ठरत गेला. अखेर बोर्डानेच कोहलीचे पंख छाटले, हे आता लपून राहिलेले नाही.

...आधीही झाले होते वाद

विराट आणि रोहित यांच्यात आधीही वाद झाले होते. २०१९च्या विश्वचषकादरम्यान विराट आणि रोहित यांच्यात बोलचाल बंद होती. मुख्य कोच यांना पत्रकारांनी विचारले तेव्हा त्यांनी दोघांचाही बचाव केला. रोहितने विराटला सोशल मीडियावर अनफॉलो केल्याचीदेखील त्यावेळी अफवा पसरली होती.

रोहितला उपकर्णधारपदावरुन दूर करायचे होते

विराट हा रोहितला वन डे संघाच्या उपकर्णधारपदावरुन दूर करू इच्छित होता. हा प्रस्ताव घेऊन तो निवडकर्त्यांकडेही गेला होता. विराटच्या मते रोहित हा ३४ वर्षांचा असल्याने त्याच्याऐवजी लोकेश राहुल किंवा ऋषभ पंत यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात यावी. बीसीसीआयला मात्र कोहलीचा प्रस्ताव मुळीच आवडला नव्हता. विराटला आपला उत्तराधिकारी घडू द्यायचे नसेल, असे काहींना वाटत होते.

युवा खेळाडूंवर अविश्वास

विराटला सर्वच खेळाडूंचा पाठिंबा असतो का, हादेखील वादाचा विषय ठरू शकतो. तो युवा आणि तुलनेत कनिष्ठ असलेल्या खेळाडूंना अधांतरी सोडतो. तो खेळाडूंना लवकर उपलब्ध होत नाही. याउलट महेंद्रसिंग धोनीची खोली सर्वांसाठी २४ तास खुली असायची. कोणताही खेळाडू सहजपणे आत प्रवेश करू शकत होता. जेवण, व्हिडिओ गेम खेळण्यापासून क्रिकेटवर चर्चा करणे कधीही शक्य होते. दुसरीकडे कोहलीसोबत मैदानाबाहेर संपर्क साधणे, हे फारच कठीण काम होते. 

टॅग्स :बीसीसीआयभारतीय क्रिकेट संघविराट कोहलीरोहित शर्मासौरभ गांगुली
Open in App