Join us  

Virat Kohli: विराट कोहली खरेच डावखुऱ्या फिरकीपटूंपुढे नांगी टाकतो?

Virat Kohli: ‘हर एक बात पे कहते हो तुम कि तू क्या है!’ मिर्झा गालिब यांच्या या ओळी विराट कोहलीच्या बाद होण्याच्या पद्धतीवर मतप्रदर्शन करणाऱ्यांना, क्रिकेट जाणकारांना आणि टीकाकारांना लागू होतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 6:23 AM

Open in App

- मतीन खान(स्पोर्ट्‌स हेड - सहायक उपाध्यक्ष लोकमत पत्रसमूह) 

‘हर एक बात पे कहते हो तुम कि तू क्या है!’ मिर्झा गालिब यांच्या या ओळी विराट कोहलीच्या बाद होण्याच्या पद्धतीवर मतप्रदर्शन करणाऱ्यांना, क्रिकेट जाणकारांना आणि टीकाकारांना लागू होतात. आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या खेळीनंतर तोंडभरून कौतुक करणारे दुसऱ्या दिवशी दुनिथ वेल्लालागेच्या चेंडूवर केवळ तीन धावा काढून विराट माघारी फिरताच पुन्हा एकदा त्याच्या फलंदाजीतील चुका शोधू लागले.

विराट डावखुऱ्या फिरकीपटूंपुढे कमकुवत ठरतो, असा निष्कर्ष काढू लागले. कोहली यंदा चारवेळा डावखुऱ्या गोलंदाजांचा बळी ठरला. मिशेल सँटनरने त्याला दोनवेळा तर एश्टन एगर आणि वेल्लालागे याने एकेकवेळा बाद केले. नवख्या वेल्लालागेच्या चेंडूवर विराट बाद होताच आगामी विश्वचषकात तो शाकिब उल हसन, न्यूझीलंडचा मिशेल सँटनर आणि दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज यांच्यासारख्या डावखुऱ्या फिरकीपटूंचा सामना करू शकेल का, अशी चिंता व्यक्त झाली. त्याच वेळी समीक्षक विसरले की, विराटने यंदा पाच शतके ठोकली असून, तो कमालीचा फॉर्ममध्ये आहे.

विराटच्या टीकाकारांना पीयूष चावलाने दमदार उत्तर दिले. तो म्हणाला, ‘सामन्याच्या दिवशी काय परिस्थिती आहे, त्यावर हे विसंबून असते. कोहलीने इतके सामने खेळले, तो कुठल्या ना कुठल्या गोलंदाजाकडून बाद होणारच! कोहलीला बाद करण्याची हीच पद्धत असेल तर प्रत्येक संघ डावखुऱ्या फिरकीपटूला संघात स्थान देईल. वेल्लालागेने ज्या चेंडूवर कोहलीला टिपले, तो चेंडू विराटच्या ‘स्कोअरिंग शॉट’पैकी एक आहे. चेंडू उशिरा आला अन् कोहली बाद झाला. असा चेंडू कोहली स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या दिशेने टोलवितो. तो अनेकदा असा खेळतो. डावखुरी फिरकी गोलंदाजी ही विराटची समस्या असती तर त्याने ‘वनडे’त ४७ शतके झळकविली नसती.’

पीयूषचे म्हणणे खरे आहे. विराट साधारण फलंदाज नाही. सचिन तेंडुलकरचे विक्रमदेखील विराटच्या आवाक्यात आहेत, असे वाटते.

आता विराटवर भाष्य करण्याची हिंमत कराल का? विराटच्या उणिवा एकवेळ सुनील गावसकर यांनी सांगितल्या तर समजू शकतो. कारण, त्यांनी कसोटीत १०,१२२ धावा काढल्या. जगातील धोकादायक गोलंदाजांचा त्यांनी सामना केला. तरीही विराटसारख्या स्टार वनडे फलंदाजाच्या उणिवा चव्हाट्यावर आणणे हे गालिबच्या त्या शेरसारखेच आहे, जो त्यांनी बादशाह बहादूर शाह जफर यांना ऐकविला होता. बादशाहने गालिब यांना रागाच्या भरात विचारले, ‘तू है क्या?’ गालिब यांचे उत्तर होते, ‘हर एक बात पर कहते हो तुम कि तू क्या है, तुम्हीं कहो कि ये अंदाज-ए-गुफ्तगू (बातचीत) क्या है.’

टॅग्स :विराट कोहलीएशिया कप 2023भारतीय क्रिकेट संघ