Virat Kohli Retirement Plan RCB IPL 2025: टीम इंडियाचा 'रनमशिन' विराट कोहली सध्या ३६ वर्षांचा आहे. तो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण त्याने टी२० क्रिकेटमधून मागील वर्षीच निवृत्ती घेतली आहे. वनडे आणि कसोटीमध्ये तो अद्यापही सक्रिय आहे. पण तो कधीही क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो असे अंदाज बांधले जातात. तो क्रिकेटला कधी रामराम ठोकेल, याचे उत्तर सध्या त्याचयाकडे नसले तरीही क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर तो काय करणार आहे, हे मात्र त्याने ठरवलेले आहे. एका कार्यक्रमात त्याने हे उत्तर दिले.
विराटचा निवृत्तीनंतरचा प्लॅन काय?
IPL 2025 ची सुरुवात २२ मार्चपासून होणार आहे. यासाठी, कोहली १५ मार्चला RCB च्या ताफ्यात सामील झाले. RCB ने एका कार्यक्रम आयोजित केला होता, त्यात विराटने निवृत्तीनंतरचा प्लॅन सांगितला. जेव्हा कोहलीला 'रिटायरमेंट प्लॅन' विचारण्यात आला, तेव्हा विराट कोहली म्हणाला, "खरं सांगायचं तर, निवृत्तीनंतर मी काय करेन हे मला माहित नाही. अलिकडेच मी माझ्या एका सहकाऱ्यालाही हाच प्रश्न विचारला आणि त्याच्याकडूनही मला हेच उत्तर मिळाले. पण मला वाटतं की मी निवृत्त झालो की मोकळा वेळ खूप मिळेल. त्यात मी कदाचित खूप प्रवास करेन. पण घाबरू नका. मी कोणतीही घोषणा करत नाहीये. सध्यातरी मी क्रिकेट खेळतोय. मला अजूनही क्रिकेट खूप आवडतंय."
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी
चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान विराट कोहलीने जबरदस्त कामगिरी केली. त्याने ५ सामन्यांमध्ये ५४च्या सरासरीने २१८ धावा केल्या. या काळात त्याच्या बॅटमधून १ शतक आणि १ अर्धशतक आले. कोहलीने पाकिस्तानविरुद्ध नाबाद शतकी खेळी केली. तर उपांत्य फेरीत त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८४ धावांची उपयुक्त खेळी करत भारताला अंतिम सामना गाठून दिला. याशिवाय त्याने स्पर्धेत तब्बल ८ झेलदेखील पकडले. फिल्डिंगमध्येही विराटने चपळाई दाखवली. एखाद्या युवा खेळाडूला लाजवेल इतका चपळ आणि ऊर्जावान खेळाडू असल्याचे त्याने या काळात वारंवार सिद्ध केले.
Web Title: Virat Kohli Contemplates Retirement Eyes Future Beyond Cricket at RCB program ahead IPL 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.