ब्रिस्बेन : विराट कोहलीसाठी २०२४ हे वर्ष सर्वच बाबतींत अत्यंत वाईट ठरले. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीदरम्यान महान क्रिकेटपटू अॅलन बॉर्डर यांनी कोहलीबद्दल चिंता व्यक्त केली. ब्रिस्बेन कसोटीत कोहली ऑफ स्टम्पबाहेरील चेंडू खेळून बाद झाला होता. अॅलन बॉर्डर यांच्या मते, कोहली आता ते चेंडू खेळण्याचा प्रयत्न करीत आहे, जे तो सहसा सोडून देतो. याचे कारण देताना बॉर्डर म्हणाले, 'कोहली एकतर मानसिकदृष्ट्या स्वस्थ नाही किंवा त्याची कारकीर्द अंतिम टप्प्यात पोहोचली असावी'
स्थानिक माध्यमांशी संवाद साधताना बॉर्डर म्हणाले, 'कोहली ब्रिस्बेनमध्ये ज्या प्रकारे आउट झाला ते वाईट आहे. जर तो चांगल्या फॉर्ममध्ये असता तर त्याने असे चेंडू सोडून दिले असते. विराट मानसिकदृष्ट्या सध्या ठीक आहे की नाही हे मला माहीत नाही; पण त्याच्याकडे पूर्वीची कौशल्ये आणि धावांची भूक राहिलेली नाही.'
विराट सातत्याने एकसारख्याच पद्धतीने बाद होत आहे. ऑफ स्टम्पच्या बाहेरील चेंडूला मारून तो स्वतःला अडचणीत आणत आहे.
कोहलीने लय गमावली
इंग्लंडचा दिग्गज खेळाडू मायकेल वॉन यानेही विराट कोहलीसाठी असेच वक्तव्य केले. वॉन म्हणाला, 'ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये चेंडूची हालचाल आणि उसळी दिसून येते अशा ठिकाणी विराट ऑफ स्टम्पबाहेर जाणारे चेंडू सोडून देतो; पण आता बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये विराट कोहली बहुतेक वेळा अशा चेंडूंवर बाद झाला आहे. असे चेंडू तो सहज सोडून देऊ शकला असता. मला वाटते की त्याने त्याचा टच पूर्णपणे गमावला आहे.'