Virat Kohli 55 Minutes Plan, Delhi Ranji Trophy : टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आता रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. कोहली दिल्लीच्या संघात सामील झाला. रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्यात दिल्लीचा शेवटचा साखळी सामना रेल्वे विरुद्ध होणार आहे. याआधी विराट कोहलीने संघातील खेळाडूंसोबत सराव सुरू केला आहे. मुंबईत संजय बांगरच्या देखरेखीखाली फलंदाजीचा सराव केल्यानंतर कोहलीने दिल्ली गाठली आणि संघासोबत सराव सत्रात सहभागी होत तयारी केली. मिळालेल्या माहितीनुसार धावांचा दुष्काळ संपवण्यासाठी कोहलीने '५५ मिनिट्स प्लॅन' तयार केला आहे. जाणून घेऊया याबाबत.
काय आहे विराटचा ५५ मिनिटांचा प्लॅन?
विराट कोहलीचा फॉर्म सध्या खूपच खराब आहे. त्याला रणजी क्रिकेटमधून फॉर्म परत मिळवण्याची चांगली संधी आहे. त्यासाठी त्याने एक खास प्लॅन केला आहे. सराव सत्रात विराटने ५५ मिनिटांचे सेशन केले. त्यात पहिली १५ मिनिटे विराटने थ्रो डाऊनचा सराव केला. यात १५ मिनिटांमध्ये तो ऑफ साईडच्या चेंडूंवर थोडासा मिस होताना दिसला. त्यानंतर ५ मिनिटे फ्रंटफूट बॅटिंग तर पुढील १० मिनिटे बॅकफूटचा सराव केला. या वेळेत त्याने बॅक ऑफ लेंग्थ चेंडू खेळण्यावर भर दिला. तेथून विराटने पुढे २० मिनिटे सुमित माथुर आणि हर्ष त्यागी या दोन स्पिनर्सच्या गोलंदाजीवर सराव केला. मग अखेरीस त्याने २० मिनिटे नवदीप सैनी, मनी ग्रेवाल, राहुल गहलोत, विवेक गुसेन आणि डावखुरा सिद्धांत शर्मा या वेगवान गोलंदाजांचा सामना केला.
विराट कोहली १३ वर्षांनंतर रणजी खेळणार
रणजी करंडक स्पर्धेच्या दुस-या टप्प्यात दिल्लीने आपला पहिला सामना २३ जानेवारीपासून सौराष्ट्रविरुद्ध खेळला. या सामन्यात कोहली खेळणार होता, पण त्याला मानेला दुखापत झाल्याने तो संघाबाहेर बसला. आता दिल्लीच्या शेवटच्या साखळी सामन्यात रेल्वे विरुद्ध खेळणार आहे. हा सामना ३० जानेवारीपासून सुरू होणार आहे. यासह विराट १३ वर्षांनंतर रणजीमध्ये पुनरागमन करणार आहे. याद्वारे कोहली आपल्या खराब फॉर्ममधून बाहेर परतण्याचा प्रयत्न करेल.