माजी भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहली आता फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ३० नोव्हेंबर रोजी रांची येथे सुरू होत आहे. या मालिकेमध्ये विराट कोहली एका विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. जर विराटने या मालिकेत आणखी शतक झळकावले तर, तो क्रिकेटच्या कोणत्याही एका फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरेल.
विराट कोहलीने यापूर्वीच एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५१ शतके झळकावून महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम मोडला. आता, कोहली आणखी एका खास विक्रमाच्या जवळ आहे. विराटने ५२ वे एकदिवसीय शतक पूर्ण केले तर तो एकाच फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरेल. आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाने एकदिवसीय, कसोटी किंवा टी-२० यापैकी कोणत्याही फॉरमेटमध्ये ५२ शतकांचा आकडा गाठला नाही. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा एकमेव क्रिकेटपटू आहे, ज्याने कसोटीमध्ये ५१ शतक झळकावली आहेत.
विराट कोहलीचे लक्ष सध्या २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत खेळण्यावर आहे. त्यामुळे, आगामी दक्षिण आफ्रिका मालिकेतील त्याची कामगिरी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत शून्यावर बाद झाल्यानंतर, कोहलीने तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात नाबाद ७४ धावांची दमदार खेळी केली.
कोहली रांचीला पोहोचला असून त्याने तयारी सुरू केली आहे. त्याचे काही सराव करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विराट कोहलीने यापूर्वी टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो दक्षिण आफ्रिका आणि त्यानंतरच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये कशी फलंदाजी करतो? यावरच तो पुढील विश्वचषकात खेळताना दिसणार की नाही, हे ठरेल.