नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी खेळाडूंचे नवीन वार्षिक करार जाहीर केले असून यात मोठे बदल करण्यात आले आहेत.
वरिष्ठ सुपरस्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना अपेक्षांनुसार ‘ब’ श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, बीसीसीआयने ७ कोटी रुपये मानधन असलेली ‘ए प्लस’ ही सर्वोच्च श्रेणीच आता रद्द केली आहे. बीसीसीआयने एकूण ३० पुरुष आणि २१ महिला क्रिकेटपटूंना अ, ब आणि क श्रेणीचे वार्षिक करार देण्याची घोषणा केली आहे.
गिल, बुमराह आणि जडेजा ‘अ’ श्रेणीत
नवीन करारानुसार, दोन प्रकारच्या क्रिकेटमधील कर्णधार शुभमन गिल, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना ‘अ’ श्रेणीत स्थान मिळाले आहे. बीसीसीआयने अद्याप तिन्ही श्रेणींसाठीच्या मानधनाची घोषणा केलेली नाही. यापूर्वीच्या रचनेनुसार ‘अ’ श्रेणीसाठी ५ कोटी, ‘ब’ श्रेणीसाठी ३ कोटी आणि ‘क’ श्रेणीसाठी १ कोटी रुपये दिले जात होते.
कोहली-रोहितची श्रेणी का घसरली?
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून ते सध्या केवळ एकदिवसीय प्रकारातच खेळत आहेत. नियमांनुसार एकाच प्रकारात खेळणारे खेळाडू सर्वोच्च श्रेणीत राहू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना ‘ब’ श्रेणीत स्थान देण्यात आले आहे.
‘ए प्लस’ श्रेणी रद्द करण्यामागचे कारण
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या सूचनेवरून प्रशासकांच्या समितीने ‘ए प्लस’ श्रेणी सुरू केली होती, असे मानले जाते. ही श्रेणी तिन्ही प्रकारच्या (कसोटी, वनडे, टी-२०) क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी राखीव होती. इतक्या वर्षांत केवळ कोहली, रोहित, जडेजा आणि बुमराह यांनाच या श्रेणीचा मान मिळाला होता. आता यातील तीन बडे खेळाडू एक किंवा दोन प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत.