Cricketers Push Car Video: क्रिकेटच्या मैदानात अनेकदा खेळाडू आपली ताकद आणि चपळाई दाखवत असतात, पण सिडनीमध्ये सुरू असलेल्या बिग बॅश लीग (BBL) दरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मैदानात पोहोचण्यापूर्वीच आपली शारीरिक ताकद एका वेगळ्या कामासाठी वापरावी लागली. सिडनी थंडर विरुद्धच्या सामन्यासाठी स्टेडियमकडे जात असताना पर्थ स्कॉर्चर्सच्या खेळाडूंची टॅक्सी वाटेतच बंद पडली. परिणामी, सामना वेळेत गाठण्यासाठी या स्टार क्रिकेटपटूंना चक्क टॅक्सीला धक्का मारावा लागला.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पर्थ स्कॉर्चर्सचे खेळाडू लॉरी इव्हान्स, ॲश्टन ॲगर, आरोन हार्डी आणि महली बियर्डमन हे एका टॅक्सीने (उबर) सिडनी शोग्राउंड स्टेडियमकडे जात होते. मात्र, स्टेडियमच्या अगदी जवळ असताना अचानक त्यांची टॅक्सी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. रहदारी आणि वेळेची कमतरता लक्षात घेता, खेळाडूंनी टॅक्सीत बसून राहण्यापेक्षा स्वतः खाली उतरून गाडीला धक्का देण्याचा निर्णय घेतला.
सोशल मीडियावर व्हिडिओचा धुमाकूळ
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, किमती स्पोर्ट्स किट आणि गणवेशात असलेले हे नामांकित खेळाडू भर रस्त्यात टॅक्सीला जोरात धक्का मारत आहेत. अखेर काही अंतरापर्यंत धक्का मारल्यानंतर टॅक्सी सुरू झाली आणि खेळाडू वेळेत स्टेडियमवर पोहोचू शकले.
खेळाडूंची मजेशीर प्रतिक्रिया
या घटनेनंतर खेळाडूंच्या जिद्दीचे आणि त्यांच्या साधेपणाचे कौतुक होत आहे. पर्थ स्कॉर्चर्सचा फलंदाज लॉरी इव्हान्सने या अनुभवाबद्दल हसत हसत सांगितले की, सामना सुरू होण्यापूर्वीच आमचा वॉर्म-अप झाला होता. हे थोडे विचित्र होते, पण आम्हाला वेळेत पोहोचणे महत्त्वाचे होते. विशेष म्हणजे, या धावपळीचा खेळाडूंच्या कामगिरीवर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही. पर्थ स्कॉर्चर्सने या सामन्यात सिडनी थंडरवर विजय मिळवला.