राजकोट : मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज अंकित बावणे याच्या नाबाद शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीच्या दिशेने भक्कम वाटचाल करत उत्तराखंडला ४ गड्यांनी नमवले. उत्तराखंडच्या ६ बाद २५१ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राने ४९.५ षटकांत ६ बाद २५२ धावा केल्या. अखेरपर्यंत नाबाद राहिलेल्या अंकितने १३२ चेंडूंत १२ चौकार व एका षटकारासह नाबाद ११३ धावा काढत संघाला विजयी केले.
महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत उत्तराखंडला मर्यादित धावसंख्येत रोखले. सलग तीन शतके ठोकलेला कर्णधार ऋतुराज गायकवाडने (२१) आक्रमक सुरुवात केली, मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. ठरावीक अंतराने धक्के बसल्याने महाराष्ट्राची एक वेळ ४ बाद ७५ धावा अशी अवस्था झाली. येथून अंकितने संघाला सावरताना नौशाद शेखसह (४७) पाचव्या गड्यासाठी १०० धावांची भागीदारी केली. अंकितने आवश्यक धावगतीनुसार फटाकेबाजी करत संघाला विजयी केले.
त्याआधी महाराष्ट्राने गोलंदाजीत सांघिक खेळ केला. मुकेश चौधरी व जगदीश झोपे यांनी प्रत्येकी २, तर प्रदीप दाढे व अझिम काझी यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. उत्तराखंडकडून सलामीवीर तनुष गुसैन (५५) आणि स्वप्नील सिंग (६६) यांनी अर्धशतकी खेळी करत संघाला समाधानकारक मजल मारून दिली.
संक्षिप्त धावफलक :
उत्तराखंड : ५० षटकांत ६ बाद २५१ धावा (स्वप्नील सिंग ६६, तनुष गुसैन ५५; जगदीश झोपे २/४५, मुकेश चौधरी २/६८.) पराभूत वि. महाराष्ट्र : ४९.५ षटकांत ६ बाद २५२ धावा (अंकित बावणे नाबाद ११३, नौशाद शेख ४७; स्वप्नील सिंग २/२०, हिमांशू बिस्त २/४२.)