टी २० वर्ल्डकपमध्ये भारताविरोधातील सामना न खेळण्याचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तानी संघाचा श्रीलंकेतील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे श्रीलंकेला मोठा फटका बसला असून हजारो क्रिकेटप्रेमींनी १४-१५ फेब्रुवारीची हॉटेल, तिकीट बुकिंग रद्द केली आहेत. यामुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्ड कमालीचे नाराज असून त्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्याने क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यावरून सध्या क्रिकेट विश्वात मोठा वाद निर्माण झाला आहे. १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकल्याने यजमान श्रीलंका क्रिकेट कमालीचे संतप्त झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या या निर्णयामुळे श्रीलंकेतील पर्यटन क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसत असून कोलंबोतील अनेक मोठ्या हॉटेल्सचे बुकिंग रद्द झाले आहे. यामुळे संतापलेल्या श्रीलंकेने पाकिस्तानी खेळाडूंना थ्री किंवा फाईव्हस्टार हॉटेलमध्ये न ठेवता एका झोपडीवजा दिसणाऱ्या भागात नेऊन ठेवल्याचे समोर येत आहे.
बांगलादेश क्रिकेट संघाला भारतात खेळण्यास सुरक्षिततेचे कारण देत नकार दिल्यामुळे आयसीसीने त्यांना स्पर्धेतून बाहेर काढले होते. या निर्णयाचा निषेध म्हणून आणि बांगलादेशला पाठिंबा दर्शवण्यासाठी पाकिस्तान सरकारने आपल्या संघाला भारताविरुद्ध न खेळण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या राजकीय पेचप्रसंगामुळे श्रीलंकेचे कंबरडे मोडले आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून पाकिस्तानी संघाला श्रीलंकेने या वागण्याची चांगलीच अद्दल घडविल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तान संघाला 'दुय्यम' वागणूक?
सोशल मीडियावर अशा चर्चांना उधाण आले आहे की, पाकिस्तानच्या या भूमिकेमुळे श्रीलंका क्रिकेट त्यांना हवी तशी सुविधा पुरवत नाहीये. मात्र, अधिकृतपणे SLC ने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या व्हायरल व्हिडीओमध्ये पाकिस्तानी खेळाडू दिसत आहेत. या पाहुणचाराची उदासी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. हा व्हिडीओ स्टेडिअमवर जातानाच्या परिसरातील असण्याची देखील शक्यता आहे. कारण या व्हिडीओमध्ये शेवटी संघाला बसण्याची सोय केल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ प्रॅक्टीस मॅचचा देखील असू शकतो.