Ball hits Umpire UAE vs PAK Asia Cup 2025: १७ सप्टेंबरला नाट्यमय घडामोडींनंतर पाकिस्तानच्या संघाने अखेर युएईविरूद्ध सामना खेळला. पाकिस्तानने या सामन्यात युएईला पराभूत केले आणि स्पर्धेच्या सुपर-४ फेरीत प्रवेश मिळवला. या सामन्यात एका पंचाच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना मैदानाबाहेरही जावे लागले. UAE डावाच्या पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात ही घटना घडली, जेव्हा एका फिल्डरचा थ्रो चुकून पंचांच्या डोक्यावर लागला. घडलेल्या घटनेवर बोलताना, माजी पाकिस्तानी कर्णधार आणि समालोचक वसीम अक्रम याने केलेली कमेंट क्रिकेट चाहत्यांना अजिबात आवडली नाही.
नेमके काय घडले?
UAE डावाच्या पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात (५.५) पाकिस्तानी विकेटकीपर मोहम्मद हरिसचा एक थ्रो पंच रुचिरा पल्लियागुरुगे यांना लागला. यामुळे खेळ थोडा वेळ थांबवावा लागला. चेंडू ५७ वर्षीय पंचावर लागताच, गोलंदाज सॅम अयुब त्यांच्याकडे धावला आणि त्यांना आधार दिला. इतर खेळाडूही लगेच त्यांच्याकडे धावले. अयुब यांने रुचिरा पल्लियागुरुगे यांची टोपी काढून त्यांना आधार दिला. त्यानंतर पाकिस्तानी संघाच्या फिजिओला बोलावण्यात आले, त्यांनी पल्लियागुरुगे यांची कंकशन चाचणी केली. त्यानंतर त्यांना मैदानाबाहेर विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. त्यांच्या जागी बांगलादेशचे रिझर्व्ह पंच गाजी सोहेल यांनी उर्वरित सामना सांभाळला. पाहा व्हिडीओ-
वसीम अक्रमवर चाहते संतापले...
जेव्हा ही घटना घडली, तेव्हा महान पाकिस्तानी खेळाडू वसीम अक्रम समालोचन करत होते. त्यांनी मस्करीत क्षेत्ररक्षकाच्या थ्रोला "बुल्स आय" म्हणजेच अचूक थ्रो असे म्हटले. वसीम म्हणाले, "चेंडू थेट पंचाच्या डोक्यावर लागला, काय थ्रो आहे ! बुल्स आय..!" सोशल मीडियावरील काही चाहत्यांना त्यांची टिप्पणी आवडली नाही. पंचांच्या डोक्याला चेंडू लागणे ही गंभीर बाब आहे त्यामुळे याबाबत शब्द जपून वापरायला हवे असे चाहत्यांनी अक्रमला सुनावले.