पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि इंग्लिश यांचं काय वावडं आहे, हे कोण सांगू शकणार नाही. आतापर्यंत अनेकदा पाकिस्तानी खेळाडूंची इंग्लिश बोलण्यावरून फजिती झाल्याचे पाहायला मिळाले आहे. निदान त्यातून तरी धडा घेत काही खेळाडूंनी स्वतःची इंग्रजी सुधारली आहे, परंतु अजूनही फजिती होण्याची परंपरा कायम आहे. मैदानावर जबरदस्त कामगिरी केल्यानंतर इंग्रजी बोलताना पाक खेळाडूंची भंबेरी उडताना आजही पाहायला मिळत आहेत. असाच एक किस्सा मंगळवारी बिग बॅश लीगमध्ये घडला. हॅटट्रिक नोंदवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या पाक खेळाडूला जेव्हा सामनावीराचा पुरस्कार दिला, त्यावेळी इंग्लिश ट्रान्सलेशन करण्यासाठी त्याला नेपाळच्या खेळाडूची मदत घ्यावी लागली.
बिग बॅश लीगमध्ये मंगळवारी एकपाठोपाठ दोन हॅटट्रिकची नोंद झाली. अॅडलेड स्ट्रायकर संघाच्या रशीद खाननं सिडनी सिक्सर्सविरुद्ध हॅटट्रिक घेत 2020मधील सर्वप्रथम सलग तीन विकेट घेणाऱ्या गोलंदाजाचा मान पटकावला. या सामन्यातनंतर मेलबर्न स्टार्स आणि सिडनी थंडर्स यांच्यातील लढीतही हॅटट्रिक नोंदवली गेली. जबरदस्त फॉर्मात असलेल्या हॅरिस रौफनं ही हॅटट्रिक नोंदवली. त्यानं थंडर्सच्या 3 फलंदाजांना माघारी पाठवून पुन्हा एकदा संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या सिडनी थंडर्स संघानं 5 बाद 145 धावा केल्या. कॅलम फर्ग्युसन ( 35) आणि मॅथ्यू गिल्केस ( 41) यांनी आपली भूमिका चोख बजावली. या सामन्याच्या अखेरच्या षटकात पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रौफनं हॅटट्रिक घेतली. मेलबर्न स्टार्स संघाकडून हॅटट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. त्यानं गिल्केस, फर्ग्युसन आणि डॅनिएल सॅम्स यांना बाद केले. मेलबर्न स्टार्सनं 146 धावांचे लक्ष्य 6 विकेट आणि 13 चेंडू राखून पार केले. मार्कस स्टॉयनिस ( 50) आणि ग्लेन मॅक्सवेल ( 59*) यांनी तुफानी खेळी करून मेलबर्न स्टार्सचा विजय पक्का केला.
पाहा व्हिडीओ...