PSL 08 - पाकिस्तान सुपर लीग २०२३ मध्ये बुधवारी रेकॉर्डब्रेक खेळ झाला. इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉयने PSL मधील विक्रमी धावांचा पाठलाग करताना क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून ६३ चेंडूत १४५ धावांची नाबाद खेळी करत संघाला थरारक विजय मिळवून दिला. जेसन रॉयच्या शतकाच्या बळावर क्वेटाने बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पेशावर झल्मीचा आठ गडी राखून पराभव केला. जेसन रॉयच्या या रेकॉर्ड ब्रेकिंग खेळीने पाकिस्तानातील महिला चाहत्यांना सर्वात मोठा धक्का बसला कारण बाबर आजमचे शतक व्यर्थ ठरले.
कंगाल पाकिस्तानात क्रिकेटपटूच्या घरी होऊ लागली चोरी; १६ लाख लंपास, बायको अन् तो...
ग्लॅडिएटर्ससमोर विजयासाठी २४१ धावांचे लक्ष्य होते आणि क्वेटाने ते १० चेंडू राखून पूर्ण केले. पीएसएलच्या इतिहासातील लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या दृष्टीने हा सर्वात मोठा विजय ठरला. ७ मार्च रोजी, इस्लामाबाद युनायटेडने २०७ धावांचे लक्ष्य गाठून एक विक्रम केला होता, जो क्वेटाने जेसन रॉयच्या धडाक्याने एका दिवसात आपल्या नावावर केला. कर्णधार बाबरच्या ११५ धावांच्या जोरावर पेशावरने २ विकेट्स राखून २४० धावा केल्या होत्या.
क्वेटाच्या फलंदाजांनी पेशावरच्या गोलंदाजांना चांगले चोपून काढले आणि एकूण ४० चौकार लगावले. पीएसएलमध्ये एका संघाकडून सर्वाधिक चौकार मारण्याचा हा विक्रम आहे. क्वेटाच्या चार फलंदाजांनी मिळून १० षटकार आणि ३० चौकार मारले. संपूर्ण सामन्यात केवळ चार विकेट पडल्या. क्वेटाने लक्ष्याचा पाठलाग करताना स्फोटक सुरुवात केली. अवघ्या २.५ षटकांत ४१ धावा झाल्या. मार्टिन गुप्टिल आठ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह २१ धावा करून परतला. त्याच्या पाठोपाठ आलेल्या विल स्मीडने २२ चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांसह २६ धावा केल्या. तो बाद झाला तेव्हा क्वेटाची धावसंख्या १२ षटकांत २ बाद १५० अशी होती. यानंतर जेसन रॉयला मोहम्मद हाफिजची साथ मिळाली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ३८ चेंडूत ९३ धावा केल्या. हाफिजने केवळ १८ चेंडू खेळून सहा चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ४१ धावा केल्या.
तत्पूर्वी, पेशावरच्या फलंदाजांनीही धावा केल्या. कर्णधार बाबरने सर्वाधिक ६० चेंडूत शतक पूर्ण केले. बाबर ६५ चेंडूंत १५ चौकार व ३ षटकार खेचून ११५ धावांवर रन आऊट झाला. सैम आयुबने ३४ चेंडूंत ७४ धावा केल्या. रोव्हमन पॉवेलनेही १८ चेंडूंत नाबाद ३५ धावा चोपल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"