Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : IPL मधील नव्या करोडपती खेळाडूची कमाल; प्रतिस्पर्धी फलंदाजांना नाचवलं तालावर

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं नववर्षाची दणक्यात सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 12:00 IST

Open in App

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं नववर्षाची दणक्यात सुरुवात केली. टीम इंडियानं श्रीलंका ( ट्वेंटी-20) आणि ऑस्ट्रेलिया ( वन डे ) यांच्यावर दणदणीत मालिका विजय नोंदवला. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकताना टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडनेही 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत धुमाकूळ घातला आहे. प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियानं मंगळवारी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. टीम इंडियानं मंगळवारी झालेल्या सामन्यात दुबळ्या जपानवर 10 विकेट्स व 271 चेंडू राखून विजय मिळवला. प्रथम गोलंदाजी करताना फिरकीपटू रवी बिश्नोईनं लक्षवेधक कामगिरी करताना चार विकेट्स घेतल्या.

गतविजेत्या टीम इंडियानं 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात दणदणीत विजयाची नोंद केली. मंगळवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियानं तोच फॉर्म कायम राखताना जपानचा धुव्वा उडवला. या सामन्यात टीम इंडियानं जपानचा संपूर्ण संघ 41 धावांत तंबूत पाठवला. 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील ही आतापर्यंतची दुसरी नीचांकी खेळी ठरली.  यापूर्वी ऑस्ट्रेलियानं  2004च्या वर्ल्ड कप स्पर्धेत स्कॉटलंड संघाला 22 धावांत तंबूत पाठवले होते.

बिश्नोईनं 8 षटकांत 3 निर्धाव षटकं टाकताना 5 धावांत 4 विकेट्स घेतल्या. त्यानं शू नोगुची ( 7), काझुमासा ताकाहाशी ( 0), इशान फार्टियाल ( 0) आणि अॅश्ली थुंर्गाट ( 0) यांना बाद केले. बिश्नोईच्या या चार विकेट्सचा व्हिडीओ बीसीसीआयनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या लिलावात बिश्नोईला किंग्स इलेव्हन पंजाबला 2 कोटींत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. राजस्थानच्या या खेळाडूनं युवा वन डे स्पर्धेत सात सामन्यांत 4.37च्या सरासरीनं 12 विकेट्स गेतल्या आहेत. विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्यानं साजेशी कामगिरी केली आहे.

पाहा व्हिडीओ...

U19CWC : टीम इंडियानं तब्बल 271 चेंडू व 10 विकेट्स राखून सामना जिंकला

U19CWC : टीम इंडियाचा भीमपराक्रम, वर्ल्ड कप स्पर्धेत रचला विक्रम

टॅग्स :19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कपकिंग्ज इलेव्हन पंजाबआयपीएल 2020आयपीएल लिलाव 2020