Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video - भारताकडून पराभव झाल्यावर पाकिस्तानच्या चाहत्याने फोडला TV, सेहवागने घेतली फिरकी

India vs Pakistan : टीम इंडियाच्या विजयानंतर सर्वत्र फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे पाकिस्तानचे चाहते मात्र पराभवामुळे खूप निराश झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 12:57 IST

Open in App

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. या स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान यांच्यात सामना झाला. भारताने सुरूवातीपासूनच शानदार गोलंदाजी करून पाकिस्तानी फलंदाजांवर दबाव टाकला. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी ३-३ बळी पटकावले. एकिकडे १५० चा आकडा गाठणे कठीण वाटत असताना पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी १६० धावांचे आव्हानात्मक लक्ष ठेवले होते. अर्शदीप सिंगने पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात माघारी पाठवून भारताला चांगली सुरुवात करून दिली. अखेरच्या काही षटकांमध्ये पाकिस्तानने डाव सावरला आणि २० षटकांत ८ बाद १५९ धावा करून भारतासमोर विजयासाठी १६० धावांचे आव्हान ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना किंग कोहलीने ऐतिहासिक खेळी केली.

टीम इंडियाच्या विजयानंतर सर्वत्र फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे पाकिस्तानचे चाहते मात्र पराभवामुळे खूप निराश झाले. काही चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना, राग व्यक्त केला. तर एका व्यक्तीने पराभवाचा राग थेट टीव्हीवरचा काढला आणि टीव्हीच फोडल्याची घटना घडली आहे. याचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. विरेंद्र सेहवागने देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. 

"हा फक्त खेळ आहे, यात टीव्हीचा काय दोष"

सेहवागने "ऱिलॅक्स शेजारी, हा फक्त खेळ आहे. चांगला प्रयत्न केलात. आमच्या येथे दिवाळी आहे त्यामुळे फटाके फोडत आहेत आणि तुम्ही विनाकारण टीव्ही फोडताय. यात टीव्हीचा काय दोष" असं आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. भारताकडून हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले. तर भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांना १-१ बळी घेण्यात यश आले. पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात अत्यंत निराशाजनक झाली होती. भारताचे दोन्ही सलामीवीर संघाच्या अवघ्या १० धावांवर माघारी परतले होते. मात्र विराट कोहलीने सावध खेळी करून डाव सावरला. सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल हेही स्वस्तात परतले. संघाची धावसंख्या ३१ असताना ४ गडी बाद झाले होते. अशा स्थितीत किंग कोहलीने संघाचा डाव सावरला आणि अखेरच्या षटकापर्यंत नेला. विराट कोहलीने ५३ चेंडूत ८२ धावांची नाबाद खेळी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. 

किंग कोहलीची विराट खेळी 

हॅरीस रौफच्या १९व्या षटकात विराटने दोन खणखणीत षटकार खेचून १५ धावा जोडल्या. भारताला आता६ चेंडूंत १६ धावा हव्या होत्या. मोहम्मद नवाजच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने उत्तुंग फटका मारला, परंतु बाबरने झेल टिपला. हार्दिक ३७ चेंडूंत ४० धावांवर बाद झाला. ३ चेंडूंत १३ धावा हव्या असताना विराटने खणखणीत षटकार खेचला अन् हाईटमुळे तो नो बॉल ठरवला गेला. आता ३ चेंडूंत ६ धावाच करायच्या होत्या. फ्री हिटचा चेंडू नवाजने वाईड टाकला. फ्री हिटवर चेंडू स्टम्पवर आदळून फाईन लेगला गेला, परंतु विराट व दिनेश कार्तिकने ३ धावा पळून काढल्या. पाकिस्तानचे खेळाडू प्रचंड नाराज दिसले. डेड बॉलची मागणी करू लागले. २ चेंडू २ धावा हव्या होत्या आणि कार्तिक स्ट्राईकवर होता. पण, कार्तिक स्टम्पिंग झाला. १ चेंडू २ धावा असे असताना अश्विन स्ट्राईकवर होता. नवाजने Wide टाकला अन् सामना बरोबरीत आला. अश्विनने विजयी चौकार मारला आणि भारताने ४ गडी राखून सामना जिंकला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारतपाकिस्तानविरेंद्र सेहवाग
Open in App