लॉर्ड्स, अॅशेस 2019 : स्टीव्ह स्मिथनं दोन्ही डावांत केलेले शतक आणि नॅथन लियॉनच्या फिरकीची कमाल, याच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं अॅशेस कसोटी मालिकेचा पहिला सामना मोठ्या फरकानं जिंकला. या पराभवामुळे यजमान इंग्लंड 0-1 अशा पिछाडीवर गेले असून दुसरा सामना 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या कसोटीसाठी इंग्लंड संघाने शनिवारी 12 सदस्यीय संघ जाहीर केला असून त्यात फिरकीपटून मोईन अलीला डच्चू देण्यात आला आहे. पण, दुखापतग्रस्त जेम्स अँडरसनच्या अनुपस्थितीत जोफ्रा आर्चरला दुसऱ्या कसोटीत खेळण्याची संधी मिळू शकते. वर्ल्ड कप स्पर्धेतील इंग्लंडचा हिरो ठरलेला आर्चर ऑसी फलंदाजांवर भारी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अँडरसनला पर्याय म्हणून जोफ्रा आर्चरचा विचार केला जाऊ शकतो. आर्चरने त्याच्या कामगिरीतून इंग्लंडच्या निवड समितीला तसा विचार करण्यास भाग पाडले आहे. त्याला पहिली कसोटी खेळण्याची संधी मिळाली नाही. अँडरसनच्या दुखापतीमुळे आणि अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आर्चर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. ससेक्स सेकंड XI संघाचे प्रतिनिधित्व करताना आर्चरने 27 धावांत 6 विकेट्स घेत ग्लोसेस्टरशायर संघाचा डाव 79 धावांत गुंडाळला. त्यानंतर फलंदाजीतही चमक दाखवताना 99 चेंडूंत 108 धावा चोपल्या.
पाहा व्हिडीओ...
दरम्यान, इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी जाहीर केलेल्या संघात अलीच्या जागी इंग्लंड संघाड डावखुरा फिरकीपटू जॅक लीचचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या कसोटीत अलीला फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्ही विभागात अपयश आले होते. त्यानं फलंदाजीत 0 व 4 धावा केल्या होत्या, तर गोलंदाजीत दोन्ही डावांत मिळून 42 षटकांत 172 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्याउलट ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनने 9 विकेट्स घेत संघाला विजय मिळवून दिला.
जुलै महिन्यात आयर्लंडविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी लीच इंग्लंडकडून खेळला होता आणि सलामीला खेळताना त्यानं 92 धावांची खेळी केली होती. प्रमुख गोलंदाज जेम्स अँडरसन आणि ऑली स्टोन या दोघांनीही दुखापतीमुळे माघार घेतली आहे. पहिल्या कसोटीत अँडरसनला दुखापत झाली होती.
संघ - जो रूट ( कर्णधार), जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, सॅम कुरन, जोए डेन्ली, जऐक लीच, जेसन रॉय, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स.