साऊदम्पटन : ‘अफगाणविरुद्धचा विजय आमच्यासाठी महत्त्वाचा होता,’ असे भारतीय कर्णधार विराट कोहलीने म्हटले. संघाने मोक्याच्यावेळी लौकिकास साजेशी कामगिरी केल्याने पराभवाच्या उंबरठ्यावरून विजय मिळवला, असेही कोहली म्हणाला.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आपली पहिली लढत खेळणाऱ्या शमीने अंतिम षटकात १६ धावांचा बचाव करण्याव्यतिरिक्त धोकादायक मोहम्मद नबी (५५ चेंडू, ५२ धावा), आफताब आलम (०) व मुजीब रहमान (०) यांना बाद करीत हॅट््ट्रिक घेतली.
कोहली म्हणाला, ‘ही लढत आमच्यासाठी अधिक महत्त्वाची होती, कारण सर्वकाही योजनाबद्ध घडले नव्हते. अशाचवेळी जबाबदारी स्वीकारत पुनरागमन करणे आवश्यक असते.’ कोहलीने शमीची प्रशंसा करताना म्हटले की, ‘प्रत्येक खेळाडू संधीची प्रतीक्षा करीत आहे. शमीने चांगली कामगिरी केली. तो अन्य गोलंदाजांच्या तुलनेत चेंडू अधिक मूव्ह करीत आहे. खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत, याची आम्हाला कल्पना आहे.’
कोहलीने जसप्रीत बुमराहची प्रशंसा करताने म्हटले, ‘त्याच्यामुळे पुनरागमन करता आले. आम्ही बुमराहच्या हुशारीचा वापर करण्यास प्रयत्नशील होतो.’ (वृत्तसंस्था)
यॉर्कर टाकण्यास माहीने सांगितले होते - शमी
‘अफगाणिस्तानविरुद्ध महेंद्रसिंग धोनीने सल्ला दिला की, हॅट््ट्रिक चेंडू यॉर्कर टाक आणि मीसुद्धा तोच विचार करीत होतो,’ असे मोहम्मद शमी म्हणाला. शमी म्हणाला, ‘यॉर्कर टाकण्याची रणनीती होती. माहीनेही हाच सल्ला दिला. हॅट््ट्रिक घेण्याची संधी असून तू काहीच बदल करू नको, असे माही म्हणाला. हॅट््ट्रिकसाठी प्रयत्न करायला हवे, असेही तो म्हणाला होता. त्यामुळे मला जे सांगितले तेच मी केले.’