नवी दिल्ली : सध्या चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगला आहे. चीनच्या धरतीवर ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकल्यानंतर भारतीय महिला संघ मायदेशात परतला आहे. मुंबई विमानतळावर संघातील शिलेदारांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेला चीतपट करून तमाम भारतीयांना खुशखबर दिली. या विजयासह भारताने ऐतिहासिक सुवर्ण पदकावर नाव कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर भारताची उप कर्णधार स्मृती मानधनाने तमाम भारतीयांच्या ओठावरील शब्द बोलून दाखवले.
खरं तर भारताच्या विजयात स्मृतीची मोलाची भूमिका होती. भारताच्या विजयानंतर बोलताना स्मृती मानधनाने म्हटले, "आम्ही सुवर्णपदक जिंकलो तो क्षण सर्वांसाठी खूप खास होता. आमचा राष्ट्रध्वज पाहून आणि तिथे आमचे राष्ट्रगीत गाताना खूप छान वाटले. आम्ही पदकतालिकेत योगदान देऊ शकलो याचा मला खरोखर आनंद आहे."
श्रीलंकेचा पराभव अन् भारताचं 'सोनेरी' यश
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेला पराभूत करून सुवर्ण पदक जिंकले. या विजयात स्मृती मानधनाने मोलाची भूमिका बजावली. सोमवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत सोनेरी कामगिरी केली. भारताने सुवर्ण पदक पटकावले, तर श्रीलंकेला रौप्य आणि बांगलादेशला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात भारताने ११६ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात श्रीलंकेला निर्धारित २० षटकांत केवळ ९७ धावा करता आल्या.