Venkatesh Iyer Smashes 70 Runs SMAT 2025 On IPL 2026 Auction Day : भारताचा अष्टपैलू व्यंकटेश अय्यर याने मंगळवारी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीतील लढतीत मोठा धमाका केला आहे. मध्य प्रदेशकडून खेळताना पंजाबविरुद्ध त्याने ४३ चेंडूत ७० धावांची दमदार खेळी केली. पुण्यातील अंबी येथील डीवाय पाटील अकादमीच्या मैदानात रंगलेल्या सामन्यातील त्याची ही खेळी खास आहे. कारण त्याची ही खेळी IPL ऑक्शनच्या दिवशी परफेक्ट ऑडीशनच आहे.
तो IPL च्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक
व्यंकटेश अय्यरनं २०२१ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाकडून IPL मध्ये धमाक्यात पदार्पण केले. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर तो टीम इंडियाकडूनही खेळला. एवढेच नाही तर आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात तो IPL च्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत दिसला. KKR च्या संघाने त्याच्यासाठी २३.७५ कोटी एवढी रक्कम मोजली होती.
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
तगडी बोली लागली, पण ना बॅट चालली ना गोलंदाजीत चमक दिसली
व्यंकटेश अय्यर हा धडाकेबाज फलंदाजीसह गोलंदाजीत उपयुक्त ठरेल, असा खेळाडू आहे. KKR नं त्याच्यावर मोठी बोली लावली. पण तो किंमतीप्रमाणे हिंमत दाखवू शकला नाही. गत हंगामात ११ सामन्यात त्याने २०.२८ च्या सरासरीनं फक्त १४२ धावा केल्या. त्याची ही कामगिरी शाहरुख खानच्या KKR ला चुना लावणारी अशीच होती. परिणामी IPL २०२६ च्या आगामी लिलावाआधी कोलकाताच्या संघाने त्याला नारळ दिला.
देशांतर्गत टी-२० तील धमाका केल्यावर KKR पुन्हा त्याच्यावर मोठा डाव खेळणार का?
आयपीएलच्या लिलावाच्या दिवशीच व्यंकटेश अय्यरनं आपल्या फलंदाजीतील धमक दाखवून दिली. त्याची ही खेळी KKR ला त्याच्याबद्दल पुन्हा विचार करायला लावणारी आहे. याशिवाय अन्य फ्रँचायझी संघही त्याला आपल्या संघात घेण्यासाठी रस दाखवतील. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ पर्समध्ये सर्वाधिक ६४. ३० कोटी रुपये घेऊन उतरणार आहे. KKR चा संघ लिलावात १३ खेळाडू खरेदी करणार आहे. ते पुन्हा व्यंकटेश अय्यरवर भरवसा दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल.