Join us

वैष्णवी शर्माने रचला इतिहास! पदार्पणातच हॅटट्रिकसह घेतल्या ५ विकेट्स, भारताने जिंकला सामना

Vaishnavi Sharma Hat trick : १९ वर्षाखालील महिला टी२० विश्वचषकात भारतीय फलंदाजांनी अवघ्या १७ चेंडूत मिळवला विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 15:29 IST

Open in App

Vaishnavi Sharma Hat trick : ICC U19 Women T20 World Cup मध्ये भारताच्या वैष्णवी शर्मा हिने कमाल करून दाखवली. वैष्णवीच्या भेदक माऱ्यामुळे मलेशिया संघाचा डाव अवघ्या ३१ धावांवर आटोपला. १९ वर्षीय वैष्णवीने महिला टी२० विश्वचषक २०२५ मध्ये पदार्पण करताना मलेशिया संघाचे अवघ्या ५ धावांमध्ये ५ बळी घेतले. महत्त्वाची बाब म्हणजे, तिने पदार्पणातच हॅटट्रिक घेत अप्रतिम कामगिरी केली. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय ठरली. तिने नवा इतिहास रचला आणि जगातील मोजक्या गोलंदाजांच्या यादीतही आपले स्थान निर्माण केले.

वैष्णवीने पदार्पणाच्या स्पर्धेतच घेतली हॅटट्रिक

मलेशिया विरुद्धच्या १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषक सामन्यात डावखुरी फिरकीपटू वैष्णवी शर्माची जादू दिसून आली. या सामन्यात तिने ४ षटके टाकली आणि केवळ ५ धावा देत ५ बळी घेतले. यावेळी तिने हॅटट्रिकही पूर्ण केली. १४ व्या षटकात तिने दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर गडी बाद करत हॅटट्रिक पूर्ण केली. तसेच दमदार दुहेरी कामगिरीसोबतच तिने नवा विक्रम प्रस्थापित केला.

सामन्यानंतर आपल्या कामगिरीबद्दल बोलताना वैष्णवी म्हणाली की, रवींद्र जाडेजा आणि राधा यादव यांना मी फॉलो करते. मी आज विकेट टू विकेट गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न केला, ज्याचा मला फायदा झाला. जेव्हा वैष्णवीला विचारण्यात आले की ५ विकेट्सपैकी तिची आवडती विकेट कोणती, तेव्हा तिने ज्या चेंडूवर हॅटट्रिक पूर्ण झाली त्याचा उल्लेख केला.

भारताने सहज जिंकला सामना

गोलंदाजांनी मलेशियाचा धुव्वा उडवल्यानंतर भारतीय फलंदाजांनीही अतिशय चांगली कामगिरी केली. ३२ धावांचे आव्हान भारतीय महिला संघाने फक्त २.५ षटकांत पूर्ण केले. त्यातही सलामीवीर गोंगाडी ट्रिशा हिने १२ चेंडूत ५ चौकार ठोकत २२५च्या स्ट्राईक रेटने नाबाद २७ धावा केल्या आणि १० गडी राखून संघाला विजय मिळवून दिला.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024महिला टी-२० क्रिकेटभारतमलेशिया