भारताच्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने क्रिकेट जगतात पुन्हा एकदा मोठा धमाका केला आहे. त्याने एशिया कप रायजिंग स्टार्स २०२५ स्पर्धेत, शुक्रवारी भारत 'A' विरुद्ध संयुक्त अरब अमिराती (UAE) सामन्यात केवळ ३२ चेंडूंत शतक झळकावले असून ४२ चेंडूंमध्ये १४४ धावांची अद्वितीय खेळी केली आहे.
दोहा येथील वेस्ट अँड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात सूर्यवंशीने १५ गगनभेदी षटकार तर ११ चौकार ठोकले. टी२० क्रिकेटमध्ये एखाद्या भारतीय फलंदाजाने केलेले हे संयुक्तपणे दुसरे सर्वात जलद शतक आहे. यापूर्वी २०१८ मध्ये ऋषभ पंतनेही ३२ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. सर्वात जलद टी२० शतकाचा विक्रम उर्विल पटेल आणि अभिषेक शर्मा यांच्या नावावर असून त्यांनी प्रत्येकी २८-२८ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते.
टी-२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेलाडू -
बिहारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सूर्यवंशीने आणखी एक जबरदस्त विक्रम आपल्या नावावर केला आहे. टी२० क्रिकेटमध्ये ३५ किंवा त्याहूनही कमी चेंडूंमध्ये दोन शतके झळकावणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, त्याने आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूंमध्ये शतक ठोकले होते. तो आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. आयपीएल इतिहासातील ते दुसरे सर्वात जलद शतक होते, वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेल (३० चेंडू) त्यांच्या पुढे आहेत.
सामन्यासंदर्भात बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना भारत 'A' संघाने निर्धारित २० षटकांत ४ खेळाडू गमावून २९७ धावां केल्या होत्या. प्रियांश आर्य (१०) लवकर बाद झाल्यानंतर, सूर्यवंशीने आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. त्याने नमन धीर (२४) सोबत दुसऱ्या विकेटसाठी १६३ धावांची मोठी भागीदारी केली. सूर्यवंशीशिवाय कर्णधार जितेश शर्मानेही ३२ चेंडूंमध्ये ८३ धावा ठोकल्या. त्याने ८ चौकार आणि ६ षटकारांसह जोरदार खेली केली. मेन्स एशिया कप रायजिंग स्टार्स स्पर्धेचे आयोजन १४ ते २३ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे.