दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या यूथ वनडेत भारतीय अंडर १९ संघाचा कर्णधार वैभव सूर्यवंशी याने नवा इतिहास रचला आहे. दुसऱ्या सामन्यात जलद अर्धशतकी खेळीसह पंतचा यूथ वनडेतील जलद अर्धशतकाचा विक्रम मोडीत काढणाऱ्या वैभव सूर्यवंशीनं कॅप्टन्सीत पहिले शतक झळकावत नव्या विक्रमाला गवसणी घातली.
विक्रमी शतक अन् पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन
यूथ वनडेत सर्वात कमी वयात नेतृत्वाची जबाबदारी पेलण्याचा विश्वविक्रम रचल्यावर आता वैभव सूर्यवंशी हा सर्वात कमी वयात शतक झळवणारा कर्णधार ठरला आहे. ६३ चेंडूत ८ षटकार आणि ६ चौकाराच्या मदतीने वैभव सूर्यवंसीनं विक्रमी शतक पूर्ण केले. शतकी खेळीनंतर त्याने पुष्पा स्टाईलमध्ये सेलिब्रेशनही केल्याचे पाहायला मिळाले. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी वैभव सूर्यवंशीनं भारतासह UAE, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या मैदानातील शतकी खेळीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या मैदानातही शतक ठोकण्याचा मोठा पराक्रम आपल्या नावे नोंदवला आहे. एवढ्या कमी वयात पाच देशांत शतक झळकावणाराही तो एकमेव फलंदाज आहे.
वैभव-एरॉन जोडीची द्विशतकी भागीदारी
मालिका आधीच गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या अंडर १९ संघाने तिसऱ्या यूथ वनडेत नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार वैभव सूर्यवंशी आणि एरॉन जॉर्ज या भारतीय जोडीनं दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा निर्णय अक्षरश: फोल ठरवला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी द्विशतकी भागीदार रचत भारतीय संघाला अगदी धमाकेदार सुरुवात करून दिली. अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेआधी वैभव सूर्यवंशीनं शतकी डाव खेळत ICC च्या मोठ्या स्पर्धेसाठी तयार असल्याचा शड्डूच ठोकला आहे.