ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये आज मोठी खळबळ उडाली आहे. वांशिक भेदभावाचा आरोप करत सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे. ४ जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरू होणारी इंग्लंडविरुद्धची पाचवी ॲशेस कसोटी ही कारकीर्दीतील शेवटची मॅच असेल, असे त्याने म्हटले आहे.
उस्मान ख्वाजाने २०११ मध्ये सिडनीच्या याच मैदानावर इंग्लंडविरुद्धच आपल्या कसोटी कारकीर्दीची सुरुवात केली होती. आता १५ वर्षांनंतर त्याच मैदानावर आणि त्याच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध तो आपला शेवटचा सामना खेळणार आहे. पत्रकारांशी संवाद साधताना ख्वाजा म्हणाला, "क्रिकेटने मला कल्पनेपेक्षा खूप जास्त दिले आहे. माझ्या घरच्या मैदानावर निवृत्ती घेण्यासारखा दुसरा आनंद नाही."
वंशवादाचा आरोप काय...
उस्मान ख्वाजा हा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाकडून खेळणारा पाकिस्तानमध्ये जन्मलेला पहिला मुस्लिम क्रिकेटपटू ठरला. मी पाकिस्तानी आणि मुस्लिम असल्याचा मला क्रिकेट खेळताना प्रचंड त्रास देण्यात आल्याचा आरोप ख्वाजाने केला आहे. "माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मला माझ्या पाकिस्तानी असल्यामुळे आणि मुस्लिम ओळखीमुळे वेगळ्या नजरेने पाहिले गेले," अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज उस्मान ख्वाजाने आपल्या निवृत्तीच्या घोषणेसोबतच ऑस्ट्रेलियन क्रिकेट मॅनेजमेंट आणि मीडियातील वर्णभेदाचे वाभाडे काढले आहेत. सिडनी कसोटीपूर्वी ख्वाजाने केलेल्या या आरोपांमुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
ख्वाजाने सांगितले की, जेव्हा जेव्हा तो खराब फॉर्ममध्ये होता किंवा दुखापतग्रस्त झाला, तेव्हा त्याला 'आळशी' आणि 'स्वार्थी' असे संबोधले गेले. "पाकिस्तानी किंवा वेस्ट इंडियन खेळाडूंना अनेकदा संघहिताची पर्वा नसलेला आणि कष्ट न करणारा म्हणून रंगवले जाते. हे सर्व मी आयुष्यभर सहन केले आहे." असे ख्वाजाने सांगितले.
"मी सामन्यापूर्वी गोल्फ खेळलो आणि दुखापतग्रस्त झालो तर माझ्यावर टीका झाली. पण असे डझनभर खेळाडू आहेत जे सामन्यापूर्वी गोल्फ खेळतात आणि दुखापतग्रस्त होतात, मात्र त्यांना कुणीही प्रश्न विचारत नाही. अनेक खेळाडू सामन्यापूर्वी १५-१५ बिअर पितात, पण त्यांना 'ऑस्ट्रेलियन लॅरिकिन्स' (मौजमजा करणारे ऑस्ट्रेलियन) म्हणून सोडून दिले जाते. मला मात्र टार्गेट करण्यात आले", असा गंभीर आरोप ख्वाजाने ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंवर केला आहे.
कसोटीतील कामगिरी
८७ कसोटी सामन्यांमध्ये त्याने ४३.३९ च्या सरासरीने ६२०६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १६ शतकांचा समावेश आहे. २०२३ मध्ये ख्वाजाला 'आयसीसी मेन्स टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) जिंकण्यातही मोलाची भूमिका बजावली होती.
निवृत्तीचे कारण काय?
सध्या सुरू असलेल्या ॲशेस मालिकेत ख्वाजाला अपेक्षित फॉर्म मिळवता आला नाही. तसेच ऑस्ट्रेलियाचा पुढील कसोटी दौरा थेट ऑगस्टमध्ये (बांगलादेशविरुद्ध) असल्याने, तोपर्यंत ख्वाजा ३९ वर्षांचा होईल. वाढते वय आणि संघात होणारे बदल लक्षात घेऊन त्याने योग्य वेळी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.