क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे, असे म्हटले जाते. कारण क्रिकेटच्या कोणत्याही सामन्यात केव्हा आणि कोणता नवा विक्रम प्रस्थापित होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. असेच अमेरिका आणि ओमान यांच्यात झालेल्या आयसीसी मेंस क्रिकेट वर्ल्ड कप लीग - २ च्या सामन्यातही बघायला मिळाले. या सामन्यात अमेरिकेने भारतीय संघाचा ४० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला. हा विक्रम आहे, एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करण्याचा. या विक्रमाशिवाय, दोन्ही संघातील स्पिनर्सनीही कमाल केली.
खरे तर, ओमानविरुद्धच्या या सामन्यात, प्रथम फलंदाजी करणाऱ्या अमेरिकेचा डाव ३५.३ षटकांत केवळ १२२ धावांवरच अटोपला. संघातील केवळ ५ फलंदाजांनांच दुहेरी धावसंख्या करता आली. या निराशाजनक फलंदाजीनंतर, आता केवळ गोलंदाजच काही चमत्तकार केला तर करू शकतील, अशी आशा होती आणि घडलेही तसेच.
अमेरिकेने फलंदाजीत केवळ १२२ धावा केल्यानंतर, त्यांच्या गोलंदाजांनी मात्र चमत्कार केला. अमेरिकेने ओमानला २५.३ षटकांत केवळ ६५ धावांतच गुंडाळले आणि ५७ धावांनी विजय मिळवला. याच बरोबर, अमेरिकेने सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी, भारतीय संघाने १९८५ मध्ये अशी कामगिरी केली होती.
४० वर्षांपूर्वी, टीम इंडियाने शारजाह क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तानविरुद्ध केवळ १२४ धावा करून, या धावसंख्येचा बचाव केला होता. मात्र, आता सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वीपणे बचाव करण्याचा विक्रम अमेरिकेच्या नावावर नेंदवला गेला आहे.
स्पिनर्सचा धुमाकूळ -महत्वाचे म्हणजे, या सामन्यात गोलंदाजीच्या बाबतीतही एक मोठी गोष्ट घडली, ती म्हणजे, दोन्ही संघांकडून एकाही वेगवान गोलंदाजाचा वापर करण्यात आला नाही. दोन्ही संघांनी केवळ स्पिनर्सकडूनच गोलंदाजी करून घेतली. यात एकूण १९ विकेट गेल्या. अशाप्रकारे, एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच दोन्ही संघांकडून केवळ स्पिनर्सचाच वापर करण्यात आला.