भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीचा खासदार गौतम गंभीर ( Gautam Gambhir) पुन्हा एकदा भारतीय तिरंदाजांच्या निशाण्यावर आला आहे. दिल्लीतील यमुना क्रीडा संकुलाला क्रिकेटच्या मैदानात बदलण्याच्या गंभीरच्या निर्णयावर भारताच्या तिरंदाजांनी विरोध दर्शवला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दीपिका कुमारीनं ट्विट करून गंभीरला असं न करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर इतरही तिरंदाज एकवटले अन् त्यांनी गंभीरला आवाहन केलं. त्यावर माजी क्रिकेटपटूनं आता स्पष्टीकरण दिलं आहे.
गौतम गंभीरनं ट्विट केलं की, तिरंदाजी मैदानाला क्रिकेटचं मैदान बनवण्याचं काम सुरू आहे. गंभीरच्या या ट्विटवर दीपिकानं लिहिलं की, २०१०साली राष्ट्रकुल स्पर्धेत याच मैदानावर मला नाव मिळालं, मी सुवर्णपदक जिंकले. या मैदानाचे क्रिकेट मैदानात रुपांतर करू नका. हे आशियातील सर्वोत्तम तिरंदाजीचं मैदान आहे. येथे तिरंदाजीचे आंतरराष्ट्रीय सामने होऊ शकतात.
अतनु दासनंही ट्विट करून हे मैदानच राहणार नाही, तर तिरंदाज सराव कुठे करतील असा प्रश्न उपस्थित केला. त्यानं लिहिलं, याला क्रिकेट मैदानात रुपांतरीत करू नका. आमच्याकडे फार कमी मैदानं आहेत आणि हे त्यापैकी सर्वोत्तम आहे. २०१०मध्ये येथे राष्ट्रकुल स्पर्धा झाली होती.'
गंभीरचं स्पष्टीकरण
मी स्पष्टच सांगतो. यमुना क्रीडा संकुलाचं मैदानाचं रुपांतर होत नाही, तर त्याचं नुतनीकरण केलं जात आहे. तिरंदाजी आणि अन्य खेळ आधी व्हायचे तसेच इथे होतील. एक खेळाडू म्हणून कोणत्याही खेळाडूचं माझ्याकडून नुकसान होणार नाही.''