Join us

रात्री सव्वा अकरा वाजता मेसेज अन् मॅच फिक्स करण्यासाठी १ कोटींची ऑफर! UP T20 लीगवर फिक्सिंगचं सावट

प्रत्येक मॅचमध्ये कमीत कमी ५० लाख मिळतील, असे सांगत मॅच फिक्सिंगसाठी उसकावण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 12:09 IST

Open in App

इंडियन प्रीमियर लीगच्या पार्श्वभूमीवर देशभरातील वेगवेगळ्या राज्यात टी-२० लीग स्पर्धेचा माहोल पाहायला मिळतोय.  उत्तर प्रदेशमधील लखनौ येथील इकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियवर UP T20 लीगचा थरार पाहायला मिळत आहे. रिंकू सिंह आणि शिवम मावी यासारखे स्टार या लीग स्पर्धेत आपला जलवा दाखवताना दिसते. यंदाच्या हंगामात खेळाडूंच्या कामगिरीसंदर्भात रंगणाऱ्या चर्चेत आता फिक्सिंगचा मुद्दा चर्चेत आला आहे. या लोकल टी-२० लीगमधील मॅच फिक्स करण्यासाठी लीगमधील एका फ्रँचायझी संघाच्या मॅनेजरला १ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

रात्री सव्वा अकरा वाजता मॅच फिक्सिंगची ऑफर

मॅच फिक्सिंगच्या ऑफरसंदर्भात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, UP T20 लीगमधील काशी रुद्रास क्रिकेट टीमचा मॅनेजर अर्जुन चौहान याला १९ ऑगस्टच्या रात्री सव्वा अकराच्या सुमारास इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका वापरकर्त्याचा मेसेज आला. संघातील एक खेळाडूला फिक्स करण्याची एक कोटींची ऑफर देण्यात आली. या प्रकरणात पोलिस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, १ कोटी रुपयांची रक्कम अमेरिकन डॉलरमध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यासंदर्भात बोलणं झालं होते. 

प्रत्येक मॅचमध्ये कमीत कमी ५० लाख मिळतील 

या प्रकरणात पोलिसांत दाखल FIR नुसार, संबंधित मेसेज हा @vipss_nakrani नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून करण्यात आला होता. वापरकर्त्याने स्वत:ला मोठा बुकी असल्याचे सांगत प्रत्येक मॅचला कमीत कमी ५० लाख रुपये मिळतील, असे आमीष दाखवून मॅनेजरला मॅच फिक्सिंगसाठी उसकावण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावरील मॅसेजनंतर मॅनेजर आणि संबंधित बुकी यांच्यात कॉलवरील संवादही झाला. या रेकॉर्डिंगच्या आधारे  मॅच फिक्सिंग संदर्भातील गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अन्य संघातील खेळाडूही  बुकीच्या संपर्कात असू शकतात, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :टी-20 क्रिकेटमॅच फिक्सिंगबीसीसीआय