ब्लोमफॉँटन : येथे सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या भारतीय संघाने विजयी सलामी दिली. भारताने रविवारी झालेल्या लढतीत श्रीलंकेवर ९० धावांनी विजय मिळवला.
यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, प्रियम गर्ग व सिद्धेश वीरच्या फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेसमोर २९७ धावांचे आव्हान ठेवले. यशस्वी जैस्वाल व दिव्यांश सक्सेना यांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली. दिव्यांशने २७ चेंडूत २३ धावा केल्या.
यशस्वीने ७४ चेंडूत ५९ धावा केल्या. या दोघानंतर कर्णधार प्रियांक गर्ग व तिलक वर्मा यांनी भारताचा डाव सावरला. तिलक वर्मा ४६ धावांवर माघारी परतला. गर्गने ७२चेंडूत ५६ धावा केल्या. सिद्धेशने २७ चेंडूत ६ चौकार व १ षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या. ध्रुव जुरेल यानेही ४८ चेंडूत नाबाद ५२ धावा फटकावल्या.
उत्तरादाखल मैदानात उतरलेल्या श्रीलंकेला चौथ्या षटकांतच भारताने धक्का दिला. सुशांत मिश्राने सलामीवीर नवोद परनविथाला (६) तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर कमिल मिसारा (३९) व कर्णधार निपुण धनंजया (५०) यांनीच तग धरला. श्रीलंकेचा संपूर्ण संघ ४५.२ षटकात २०७ धावात गुंडाळला.