Mohammed Siraj Fastest Ball, IND vs AUS 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून सुरू झाला. पहिल्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियाचा दबदबा दिसून आला. मिचेल स्टार्कने ६ विकेट घेत टीम इंडियाचा पहिला डाव १८० धावांपर्यंत रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताकडून केएल राहुल (३७), शुभमन गिल (३१) आणि नितीश रेड्डी (४२) यांनी झुंजार खेळी केली. भारतीय फलंदाजांप्रमाणे गोलंदाजांनीही पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात निराशा केली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताला केवळ एकच बळी घेता आला. पण मोहम्मद सिराजच्या एका चेंडूची चर्चा रंगली.
नेमके काय घडले?
ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान, मोहम्मद सिराजच्या एका चेंडूचा वेग १८१.६ किमी/तास होता, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या २४व्या षटकात मोहम्मद सिराजने चेंडू टाकला. सिराज वेगाने मारा करत होता. पण त्या षटकात वेगळीच गोष्ट घडली. आतापर्यंत जगात सर्वाधिक वेगाने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना १७०चा आकडा पार करता आलेला नाही. त्यात सिराजने टाकलेल्या चेंडूचा वेग १८१.६ किमी/तास दाखवला गेला. पण नंतर समजले की ही तांत्रिक चूक होती. खरा वेग तितका नव्हता.
सिराज - लाबूशेनमध्ये बाचाबाची
ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबूशेन आणि सिराज यांच्यात त्याच षटकात बाचाबाचीही झाली. साइड स्क्रीनजवळ एक प्रेक्षक जात होता, ज्याला पाहून लाबूशेन विचलित झाला आणि त्याने सिराजला चेंडू टाकण्यापासून रोखले. यामुळे सिराज नाखूष दिसला आणि त्याने मुद्दाम चेंडू स्टंपच्या दिशेने फेकला. मात्र, चेंडू थेट कीपरच्या हातात गेला.
ऑस्ट्रेलियन फलंदाजांचीही चांगली कामगिरी
पिंक बॉल कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १ बाद ८६ धावा करत आपला वरचष्मा कायम ठेवला. आता ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात भारताच्या केवळ ९४ धावांनी पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने फक्त उस्मान ख्वाजाची (१३) विकेट गमावली. त्याचा झेल जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर कर्णधार रोहित शर्माने स्लीपमध्ये घेतला. दुसरा सलामीवीर नॅथन मॅकस्विनी ३८ धावांवर तर मार्नस लाबूशेन २० धावांवर नाबाद खेळत आहे.