Ben Duckett Century, ENG vs AUS Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने तुल्यबळ ऑस्ट्रेलियाच्या विरोधात ५० षटकांमध्ये ३५१ धावांचा डोंगर रचला. सलामीवीर बेन डकेट याने केलेल्या दमदार दीडशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने मोठी मजल मारली. डकेटने १७ चौकार आणि ३ षटकारांचा आतषबाजी करत १४३ चेंडूत १६२ धावा कुटल्या आणि इतिहास रचला. अनुभवी जो रूट यानेही संयमी अर्धशतकी खेळी केली. त्याने ७८ चेंडूत ६८ धावा केल्या. तर तळाच्या फलंदाजीत जोफ्रा आर्चर याने दहा चेंडूत २१ धावांची फटकेबाज खेळी करत इंग्लंडच्या संघाला साडेतीनशे पार मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही, पण त्यांच्याकडून बेन द्वारशूवास याने सर्वाधिक तीन बळी घेतले.
इंग्लंडची खराब सुरुवात पण भागीदारीने सावरलं...
इंग्लंडच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. सलामीवीर फिल सॉल्ट १ चौकार आणि १ षटकार खेचून १० धावांवर माघारी परतला. जेमी स्मिथदेखील १५ धावा काढून बाद झाला. त्यानंतर सलामीवीर बेन डकेट आणि जो रूट यांच्या चांगली भागीदारी झाली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १५८ धावा जोडल्या. संघाला द्विशतकी मजल मारून दिल्यानंतर जो रूट बाद झाला. त्याने चार चौकारांच्या मदतीने ६८ धावांची उपयुक्त खेळी केली. रूट पाठोपाठ हॅरी ब्रुकही तीन धावांवर माघारी परतला. त्यानंतर जोस बटलर याने २३, लियम लिविंगस्टन याने १४ तर ब्राइडन कार्सने आठ धावांची खेळी करत बेन डकेटला शक्य तशी साथ दिली.
बेन डकेटचा धडाकेबाज विक्रम
एकीकडे बेन डकेट याने तुफान फटकेबाजी सुरूच ठेवत आधी शतक ठोकले. त्यानंतर वेगवान खेळी करत दीडशतकी मजल मारली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या सर्वच गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला. बेन डकेट याने तब्बल १७ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने फक्त १४३ चेंडूंमध्ये १६५ धावांची झंजावाती खेळी केली. त्याच्या या खेळीने इतिहास रचला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम बेन डकेटच्या नावे झाला. याआधी न्यूझीलंडचा माजी सलामीवीर नॅथन अँस्टल याने या स्पर्धेत सर्वाधिक १४५ धावांची खेळी केली होती. तो विक्रम मोडत आज डकेटने इतिहास रचला.
दरम्यान, इंग्लंडच्या डावात डकेट बाद झाल्यानंतर तळातील जोफ्रा आर्चरने दोन चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने अवघ्या १० चेंडूत नाबाद २१ धावा ठोकत इंग्लंडच्या संघाला ३५१ धावांपर्यंत मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियाकडून बेन द्वारशूवास याने तीन, अँडम झंपा आणि मार्नस लाबूशेन यांनी प्रत्येकी दोन तर ग्लेन मॅक्सवेलने एक बळी टिपला.
Web Title: Unbelievable England Ben Duckett creates history becomes first batter to score 150 runs in Champions Trophy Eng vs Aus
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.