ओव्हल : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार अॅरोन फिंचने बुधवारी मध्यरात्री ट्वेंटी-20 ब्लास्ट लीगमध्ये शतकी खेळी केली. सरे संघाचे प्रतिनिधित्व करतान फिंचने सोमरसेटच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आणि संघाला 6 विकेट व 21 चेंडू राखून विजय मिळवून दिला. सोमरसेटच्या 9 बाद 157 धावांचा पाठलाग करताना सरेने 16.3 षटकांत 4 बाद 158 धावा केल्या. त्यात फिंचच्या शतकी खेळीचा समावेश होता.
प्रथम फलंदाजी करतान सोमरसेटने टॉम बँटन आणि बाबर आझम या सलामीवीरांच्या जोरावर दमदार सुरुवात केली. पण, त्यानंतर अन्य फलंदाजांना मोठी खेळी साकारण्यात अपयश आल्याने सोमरसेटला 9 बाद 157 धावांवर समाधान मानावे लागले. बँटनने 28 चेंडूंत 5 चौकार व 2 चौकार मारताना 47 धावा, तर आझमने 31 चेंडूंत 3 चौकारांसह 37 धावा केल्या. इम्रान ताहीरने 25 धावांत 4 विकेट्स घेतल्या. त्याला गॅरेथ बॅटीनं ( 2/24) चांगली साथ दिली.
लक्ष्याचा पाठलाग करताना फिंच आणि मार्क स्टोनमॅन यांनी पहिल्या विकेटसाठी 49 धावा जोडल्या. स्टोनमन 18 धावांवर माघारी परतल्यानंतर सरेचे तीन फलंदाजही झटपट बाद झाले. पण, फिंचने एका बाजूनं खिंड लढवली. त्यानं 53 चेंडूंत 192.45 च्या स्ट्राईक रेटनं नाबाद 102 धावा चोपल्या. त्यात 5 चौकार व 9 षटकारांचा समावेश होता.