रोहित नाईक 
मुंबई : भानुका राजपक्ष याचा अपवाद वगळता प्रमुख फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर पंजाब किंग्ज संघाचा डाव कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध १८.२ षटकांत १३७ धावांत संपुष्टात आला. कसोटी गोलंदाज असा ‘लेबल’ लावण्यात आलेला वेगवान गोलंदाज उमेश यादव याने ४ बळी घेत पंजाबची फलंदाजी उध्वस्त केली. कागिसो रबाडाने अखेरच्या काही चेंडूंमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे पंजाबला समाधानकारक मजल मारता आली.
नाणेफेक जिंकून कोलकाताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात उमेशने कर्णधार मयांक अग्रवालला पायचीत पकडत पंजाबला मोठा धक्का दिला. विशेष म्हणजे सलग तिसऱ्या सामन्यात उमेशने पहिल्याच षटकात बळी मिळवला. 
तसेच, आयपीएल पॉवर प्लेमध्ये ५० बळी पूर्ण करणारा तो चौथा गोलंदाजही ठरला. यानंतर ठराविक अंतराने बळी मिळवत कोलकाताने पंजाबवर वर्चस्व मिळवले. पंजाबच्या या पडझडीत अपवाद राहिला तो भानुका याचा. भानुकाने केवळ ९ चेंडूंत ३१ धावांचा तडाखा दिला. त्याने शिवम मावीला चौथ्या षटकात एक चौकार आणि ३ षटकारांचा चोप दिला. यामुळे पंजाबच्या धावगतीला चांगला वेग मिळाला होता. मात्र, याच षटकात तो बाद होताच, पंजाबच्या वेगाला ब्रेक लागला. शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन यांना अपेक्षित स्ट्राइक रेटने धावा काढता आल्या नाहीत. १९ वर्षांखालील विश्वचषकात चमकलेला राज बावा आणि अष्टपैलू शाहरुख खान हेही दडपणाच्या स्थितीत बाद झाल्यानंतर पंजाबचा डाव अडचणीत आला. वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन या फिरकीपटूंनी पंजाबला जखडवून ठेवले. १५व्या षटकात उमेशने हरप्रीत ब्रार आणि राहुल चहर यांना बाद करत पंजावर आणखी दडपण आणले. परंतु, रबाडाने चांगली फटकेबाजी केली. १९व्या षटकात टिम साऊदीने त्याचा अप्रतिम झेल घेतला आणि त्यानंतर लगेच पंजाबचा डावही संपुष्टात आला.
उमेशचे ‘पॉवरप्ले’मध्ये ५० बळी
n वेगवान गोलंदाज उमेश यादव याने पहिल्या षटकात पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवाल याला पायचित केले. यासह उमेशने आयपीहल पॉवर प्लेमध्ये ५० बळींचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो तिसरा गोलंदाज आहे.पॉवर प्लेमध्ये विक्रमी ५३ गडी बाद करण्याचा मान संदीप शर्मा याला जातो. दुसऱ्या स्थानी जहीर खान आणि भुवनेश्वर कुमार आहेत. या दोघांचे प्रत्येकी ५२-५२ बळी आहेत.
n उमेश आयपीएलमध्ये एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला. पंजाबविरुद्ध उमेशचे ३३ बळी झाले. त्याच्यापाठोपाठ एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक गडी बाद करण्यात सुनील नारायणचा क्रम लागतो. नारायणचे पंजाबविरुद्ध ३२ बळी झाले.
n वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा दहाव्या स्थानावर फलंदाजीला आला मात्र त्यानेच पंजाबची इभ्रत शाबुत ठेवली. रबाडाने चार चौकार आणि एका षटकारासह २५ धावांचे योगदान देत सुस्थितीत आणले.
n केकेआर संघाला चीयर्स करण्यासाठी स्टॅन्डमध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, मुलगा आर्यन खान, बॉलिवुड स्टार अनन्या पांडे उपस्थित होते.
 लियॉम लिव्हिंगस्टोन बाद होताच सर्वांच्या आनंदाला उधाण आले होते.
खेळाडू              
मयंक पायचित गो. उमेश     ०१    ०५      ०/०    २०
धवन झे. बिलिंग्स गो. साऊदी     १६    १५      १/१     १०६
राजपक्षे झे. साऊदी गो. मावी     ३१    ०९      ३/३     ३४४     
लिव्हिंगस्टोन झे. साऊदी गो. उमेश     १९    १६      १/१     ११८
राज बावा त्रि. गो. नरेन     ११    १३      १/०      ८४
शाहरूख झे. राणा गो. साऊदी     ००    ०५      ०/०      ००
हरप्रीत ब्रार त्रि. गो. उमेश     १४    १८      १/१    ७७
ओडीयन स्मीथ नाबाद     ०९    १२      ०/१    ७५
राहूल चहर झे. राणा गो. उमेश     ००    ०२      ०/०    ००
रबाडा झे. साऊदी गो. रसेल     २५    १६      ४/१     १५६
अर्शदीप धावबाद     ००    ०१      ०/०      ००
गोलंदाज    षटक    डॉट    धावा     बळी     मेडन
उमेश      ४    १३     २३     ४    १
साऊदी      ४    १४       ३६     २    ०
मावी      २    ०४     ३९     १    ०    
चक्रवर्ती      ४    १४     १४     ०    ०
नरेन            ४    १३     २३     १     ०
रसेल     ०.२    ०२     ००     १    ०