अंडर १९ महिला वर्ल्ड कप स्पर्धेत नायजेरियाच्या संघाने मोठी उलथा पालथ केलीये. लिंबू टिंबू वाटणाऱ्या संघानं न्यूझीलंड महिला अंडर १९ संघाला वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पावसाच्या व्यत्ययानंतर निकाली लागलेल्या सामन्यात नायजेरियाच्या अंडर १९ महिला संघाने २ धावांनी विजय मिळवत क्रिकेट जगताचं लक्षवेधून घेतलं आहे. नायजेरिया संघ पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेसाठी पात्र ठरला असून त्यांनी पदार्पणाच्या स्पर्धेत मोठी कामगिरी नोंदवलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महिला अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत मोठी उलथा पालथ; तगड्या ंसंघाला नायजेरियानं दिला दणका
मलेशियाच्या मैदानात महिला अंडर-१९ टी २० वर्ल्ड कप स्पर्धा सुरु आहे. न्यूझीलंड संघाला या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पराभूत केले होते. त्यानंतर आता नायजेरिया विरुद्ध दुसरा पराभव स्वीकारावा लागल्यामुळे किवी संघाचा स्पर्धेतील प्रवासच संपुष्टात आलाय. पहिल्यांदा बॅटिंग करताना नायजेरियाच्या संघाने ६ विकेट्सच्या मोबदल्यात ६५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड महिला संघ ६ विकेट्सच्या मोबदल्यात फक्त ६३ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
१३ षटकांच्या सामन्यात न्यूझीलंडचे 'वाजले बारा'
न्यूझीलंडच्या संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नायजेरियाकडून कॅप्टन लकी पायटी हिने २२ चेंडूत १८ धावा केल्या. याशिवाय लिलियन उडेह हिने २५ चेंडूत संघाच्या धावसंख्येत १९ धावांची भर घातली. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना १३ षटकांचा खेळवण्यात आला. नायजेरियानं या १३ षटाकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात ६५ धावा केल्या होत्या.
लिंब टिंबू संघाविरुद्धच्या पराभवामुळे ओढावली स्पर्धेतून आउट होण्याची नामुष्की
नायजेरियाच्या संघानं दिलेल्या ६६ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाची सुरुवातच खराब झाली. पहिल्या १३ चेंडूत न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात करणाऱ्या दोघी पॅव्हेलियनमध्ये परतल्या. संघाच्या धावलकावर यावेळी फक्त ७ धावा लागल्या होत्या. सुरुवातीच्या धक्क्यातून सावरण्यासाठी मध्यफळीतील बॅटर्संनी संघाचा डाव सावरला. पण विजयाचं लक्ष्य गाठण्यात संघ अपयशी ठरला. लिंबू टिंबू संघानं क्रिकेटची मोठी परंपरा असलेल्या संघाला वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर काढलं.