Join us  

ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव कर्णधार उदय साहारनसाठी 'दिलासा'? इतिहासात लपलंय कारण

IND vs AUS: अंडर १९ फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियन संघाने ७९ धावांनी केले पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 12:47 PM

Open in App

IND vs AUS U19 World Cup Final: अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारताचा दणदणीत पराभव केला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २५३ धावांपर्यंत मजल मारली होती. ५० षटकांत भारताला २५४ धावांचे आव्हान होते, पण भारतीय संघाला १० विकेट्सच्या मोबदल्यात १७४ धावाच करता आल्या. त्यामुळे भारताला ७९ धावांनी पराभूत व्हावे लागले आणि उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. कसोटी चॅम्पियनशिप, सिनियर वन डे वर्ल्ड कप आणि अंडर १९ वर्ल्ड कप अशा सलग तीन स्पर्धांमध्ये भारताला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. रविवारचा पराभवही भारतीयांना जिव्हारी लागणारा असाच होता. पण तरीही हा पराभव भारताचा कर्णधार उदय साहारन याच्यासाठी वेगळ्या पद्धतीने 'दिलासा' देणारा असू शकतो असे मत काही जाणकारांनी मांडले. त्यामागे या स्पर्धांचा इतिहास कारणीभूत आहे.

फायनलमधला पराभव भारतीय कर्णधारासाठी 'गुड न्यूज' कशी?

भारताने फायनल जिंकली असती तर उदयचा समावेश मोहम्मद कैफ, विराट कोहली, पृथ्वी शॉ यांसारख्या कर्णधारांच्या यादीत झाला असता. पण तसे झाले नाही. असे असूनही, जर हा पराभव उदयसाठी वैयक्तिकरित्या 'दिलासादायक' असू शकतो. अंडर १९च्या विश्वचषक फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्यांदा आमनेसामने आले. यापूर्वी २०१२ आणि २०१८ मध्ये या दोन संघांची टक्कर झाली होती. त्या दोन्ही फायनल जिंकून भारताने विजेतेपद पटकावले. पण या दोन्ही फायनलचे विजेते कर्णधार पुढे आपले उज्ज्वल भविष्य घडवण्यात फारसे यशस्वी ठरले नाहीत.

उन्मुक्त चंदने २०१२ मध्ये नेतृत्व करत भारताला जिंकवले पण त्याला त्याची कारकीर्द घडवता आली नाही. टीम इंडिया आणि आयपीएल दोन्हीत तो प्रभाव पाडू शकला नाही. २०१८ मध्ये भारताने पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. उन्मुक्तच्या तुलनेत शॉच्या कारकिर्दीला लगेचच वेग आला आणि त्याला टीम इंडियामध्ये संधीही मिळाली, पण विविध कारणांमुळे त्याचा आलेख घसरत गेला आणि आता तो जवळपास ३ वर्षे टीम इंडियापासून दूर आहे.

स्पर्धेत उदयची चांगली कामगिरी

उदयने या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत असताना ७ डावांमध्ये ३९७ धावा केल्या. त्यात १ शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा हाच फॉर्म त्याने आणखी काही काळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये कायम ठेवला तर त्याला भारतीय संघाचे दरवाजे उघडण्यासाठी फार काळ वाट पाहायची वेळ येणार नाही.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक फायनलभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया