भारत आणि इंग्लंडच्या संघांमध्ये सुरू असलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा विस्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी याने ऐतिहासिक शतकी खेळी केली आहे. भारतीय क्रिकेटमधील उगवता सितारा म्हणून पाहिलं जात असलेल्या वैभव सूर्यवंशी याने अंतिम लढतीत आपल्या घणाघाती फलंदाजीचं दर्शन घडवलं. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर वैभवने सुरुवातीपासूनच षटकार, चौकारांची बरसात करत शतकी खेळी साकारली. त्याने अवघ्या ५५ चेंडूत १०० धावा कुटून काढत नवा इतिहास रचला. वैभव हा १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत शतकी खेळी करणारा सर्वात कमी वयाचा फलंदाज ठरला . वैभव सूर्यवंशीच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने अखेरचं वृत्त येईपर्यंत २० षटकांत दोन बाद १६७ धावांपर्यंत मजल मारली होती.
सलग सहाव्यांदा १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक देणााऱ्या भारतीय संघाची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर सुरुवात तितकीशी चांगली झाली नव्हती. वैभव सूर्यवंशीसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला आरोन जॉर्ज अवघ्या ९ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी इंग्लिश गोलंदाजांवर जोरदार प्रतिहल्ला चढवत भारतीय संघाचा डाव सावरला. यादरम्यान, वैभव सूर्यवंशी याने अधिक आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत होते.
वैभवने ३२ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र अर्धशतक पूर्ण केल्यावर त्याची बॅट आणखीनच तळपली. समोर येईल त्या इंग्लिश गोलंदाजाला झोडपून काढत त्याने मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. वैभवच्या या आक्रमणामुळे भारतीय संघाचा धावफलकही वाऱ्याच्या वेगाने दीडशेपार गेला. यादरम्यान, एक बाजू लावून धरणाऱ्या कर्णधार आयुष म्हात्रे याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र लगेच तो ५३ धावांवर बाढ झाला. वैभव आणि आयुष यांनी दुसऱ्या विकेटसाठी १४२ धावांची भागीदारी केली.
यादरम्यान, शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या वैभवने एकेरी दुहेरी धावा घेत ५५ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. या दरम्यान त्याने ८ चौकार आणि ८ षटकार ठोकले. तसेच १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत शतकी खेळी करणारा वैभव सूर्यवंशी हा सर्वात कमी वयाचा फलंदाज ठरला आहे.