Join us
Daily Top 2Weekly Top 5

U19 Asia Cup : कोण आहे Abhigyan Kundu? मुंबईकरानं जलद द्विशतकासह रचला इतिहास

वैभव सूर्यवंशीसह अंबाती रायडूचा विक्रमही मोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 17:01 IST

Open in App

भारताचा युवा फलंदाज अभिज्ञान कुंडू (Abhigyan Kundu) याने U19 आशिया कप स्पर्धेतील मलेशियाविरुद्धच्या सामन्यात द्विशतकी खेळीसह इतिहास रचला आहे. मलेशिया विरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी अर्धशतकी खेळीनंतर माघारी फिरल्यावर दुबईच्या मैदानात युवा टीम इंडियातील नव्या हिरोचा जलवा पाहायला मिळाला. अभिज्ञान कुंडू याने १२१ चेंडूत द्विशतक साजरे केले. यूथ वनडेतील हे सर्वात वेगवान द्विशतक ठरले. या सामन्यात अभिज्ञान याने १२५ चेंडूत नाबाद २०९ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ९ षटकार आणि १७ चौकार मारले. 

वैभव सूर्यवंशीसह अंबाती रायडूचा विक्रमही टाकला मागे

यूथ वनडेत सर्वोच्च धावसंख्येचा विश्वविक्रम मोडण्याची त्याला संधी होती. दक्षिण आफ्रिकेच्या जॉरिच व्हॅन शाल्कविक याने २५ जुलै २०२५ रोजी झिम्बाब्वे विरुद्ध अंडर १९ वनडेत २१२ चेंडूत २१५ धावांची खेळी केली होती. हा रेकॉर्ड थोडक्यात हुकला. अभिज्ञान कुंडू याने भारताकडून सर्वोच्च धावसंख्या करत अंबाती रायडूचा विक्रम मोडीत काढला आहे. अंबाती रायडूनं आपल्या अंडर १९ क्रिकेटच्या कारकिर्दीत नाबाद १७७ धावा केल्या होत्या. हा विक्रम आता मागे पडला आहे. त्याआधी अभिज्ञान कुंडू याने वैभव सूर्यवंशीचा विक्रमही मागे टाकला. अंडर १९ आशिया कप स्पर्धेतील सलामीच्या लढतीत वैभव सूर्यवंशीनं १७७ धावांची खेळी केली होती.   कोण आहे अभिज्ञान कुंडू?

अभिज्ञान कुंडूचा जन्म ३० एप्रिल  २००८ रोजी रोजी झाला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो मुंबई अंडर-१९ संघाचे प्रतिनिधीत्व करतो. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून भारत अंडर-१९ संघाकडून पदार्पण केलं.

टॅग्स :एशिया कप