India U-19 vs Pakistan U-19, Asia Cup Final: दुबई येथील आयसीसी अकादमीच्या मैदानात रंगलेल्या अंडर १९ आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने श्रीलंकेला एकतर्फी मात देत फायनल गाठली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे वनडे सामना प्रत्येकी २०-२० षटकांचा खेळवण्यात आला. पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने भारतीय संघासमोर १३९ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी स्वस्तात माघारी परतली. पण त्यानंतर एरॉन जॉर्ज आणि विहान अरोरा यांनी दमदार अर्धशतकासह भारतीय संघाला ८ विकेट्स राखून सहज विजय मिळवून दिला. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये पाकिस्तानच्या संघाने बांगलादेशला पराभूत केले. त्यामुळे अंडर १९ आशिया कप स्पर्धेत भारत-पाक यांच्यात सामना रंगल्याचे पाहायला मिळणार आहे. वरिष्ठ भारत-पाक यांच्यातील आशिया कप स्पर्धेनंतर पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना अंडर १९ आशिया कप स्पर्धेत हायहोल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय संघ आठव्यांदा तर पाक चौथ्यांदा खेळणार फायनल!
अंडर १९ आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने आठव्यांदा फायनल गाठली आहे. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा संघ चौथ्यांदा या स्पर्धेत फायनल खेळताना दिसणार आहे. भारतीय संघाने ६ वेळा फायनल मारली असून यंदाच्या हंगामातही भारतीय संघ प्रबळ दावेदार मानला जात आहे.
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
भारत-श्रीलंका यांच्यातील पहिल्या सेमीफायनलमध्ये काय घडलं?
श्रीलंकन कर्णधार विमन दिनसरा याने २९ चेंडूत केलेल्या ३२ धावा, चमिका हीनातीगला याने ३८ चेंडूत केलेली ४२ धावांची खेळी आणि सेथमिका सेनेविरत्न याने २२ चेंडूतील ३० धावांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेच्या संघाने निर्धारित २० षटकात ८ बाद १३८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. आयुष म्हात्रे अवघ्या ७ धावांवर परतल्यावर वैभव सूर्यंवशी ९ धावा करून बाद झाला. पण त्यानंतर एरॉन जॉर्ज आणि विहान मल्होत्रा जोडी जमली. दोघांनी अर्धशतकी खेळी करत तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाला ८ विकेट्सनी विजय मिळवून दिला. एरॉन जॉर्जनं ४९ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५८ धावांची नाबाद खेळी केली. दुसऱ्या बाजूला विहान याने ४५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने नाबाद ६१ धावा कुटल्या.