सध्या वेस्टइंडीज येथे एकोणीस वर्षाखालील मुलांचा क्रिकेट विश्वचषक (U-19 Cricket World Cup 2022) सुरू आहे. विश्वचषकात सुरुवातीपासूनच भारताचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. भारतीय संघाने साखळी फेरीतील आपले तिन्ही सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघाचा साखळी फेरीतील अखेरचा सामना शनिवारी (22 जानेवारी) युगांडाविरुद्ध झाला. भारतीय संघाने या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. या सामन्यानंतर भारतीय संघाचे मार्गदर्शक आणि दिग्गज भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी केलेली एक कृती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
लक्ष्मण यांची मने जिंकणारी कृती
युगांडाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने मोठा विजय मिळवला. युगांडा प्रथमच इतक्या मोठ्या पातळीवर क्रिकेट खेळत आहे. भारतीय संघाने या सामन्यात अपेक्षेप्रमाणे वर्चस्व गाजवले असले तरी, युगांडाच्या खेळाडूंचेही कौतुक होत आहे. सध्या भारताच्या युवा संघाचे मार्गदर्शक असलेले व्हीव्हीएस लक्ष्मण हे देखील या संघाच्या कामगिरीने प्रभावित झाले आणि सामना संपल्यानंतर लक्ष्मण यांनी थेट युगांडा संघाचे ड्रेसिंग रुम गाठले.
युगांडाच्या खेळाडूंना मार्गदर्शन
लक्ष्मण यांनी युगांच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन युगांडाच्या खेळाडूंना मार्गदर्शन केले. तसेच, त्यांनी आपले अनुभव त्या खेळाडूंना सांगितले. लक्ष्मण यांच्या या अचानक भेटीने युगांडाचे खेळाडू कमालीचे उत्साहीत झालेले पाहायला मिळाले. लक्ष्मण हे युगांडा संघाला मार्गदर्शन करत असतानाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सामन्याचा निकाल
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 405 धावा बनवल्या. यात सलामीवीर अंगकृष रघुवंशी व राज बावा यांनी शतके ठोकली. प्रत्युत्तरात युगांडा संघ भारतीय संघासमोर अवघ्या 79 धावांवर बाद झाला. कर्णधार निशांत संधू याने सर्वाधिक चार बळी आपल्या नावे केले. भारतीय संघाचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना बांगलादेश विरुद्ध होणार आहे.