नवी दिल्ली - क्रिकेटमध्ये पंचांचा निर्णय अंतिम असे म्हटले जाते. आता रेफरल सिस्टिममुळे पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागता येते. मात्र कधीकधी पंचांचे निर्णय कळीचा मुद्दा ठरतात आणि त्यावरून मैदानात वाद निर्माण होता. असाच वाद गुरुवारी सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिक्रेट स्पर्धेत हैदराबाद आणि कर्नाटक यांच्यात झालेल्या सामन्यात झाला. या वादात बराच वेळ वाया गेल्याने मागाहून आंध्र प्रदेश आणि केरळमधील सामन्याची षटके कमी करून 13-13 षटकांचा सामना खेळवावा लागला.
त्याचे झाले असे की, हैदराबादचा कर्णधार अंबाती रायडूने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. मग कर्नाटकने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 20 षटकात 203 धावा फटकावल्या. पण खेळ संपल्यावर पंचांनी त्यांच्या धावसंख्येत दोन अतिरिक्त धावा जोडण्याचा निर्णय घेतला. कारण कर्नाटकचा सलामीवीर करुण नायर याने मोहम्मद सिराजच्या एका चेंडूवर मारलेला फटका मेहंदी हसनने सीमारेषेवर अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यादरम्यान त्याचा पाय सीमारेषेला लागला होता. पण खेळ सुरू असताना पंच आणि स्कोअरर यांच्यातील गफलतीमुळे या धावा कर्नाटकच्या धावसंख्येत जोडल्या गेल्या नाहीत. पण डाव आटोपल्यावर पंचांनी कर्नाटकच्या धावसंख्येत दोन अतिरिक्त धावा जोडल्या.
पण कर्नाटकने दिलेल्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने 203 धावा फटकावल्या. त्यानंतर खऱ्या वादास तोंड फुटले. हैदराबादचा कर्णधार अंबाती रायडू आणि त्याचे सहकारी सुपर आधीच्या धावसंख्येप्रमाणे सामना टाय झाल्याचा दावा करून सुपर ओव्हरची मागणी करू लागले. त्यामुळे मैदानात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अखेर दहा मिनिटे चाललेल्या वादानंतर कर्नाटकला विजयी घोषित करण्यात आले. मात्र या वादाची गंभीर दखल बीसीसीआयने घेतली असून, अहवाल मागवला आहे.