भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्याच्या तयारीला लागला आहे. पण, एका ट्विटमुळे तो सध्या नेटिझन्सच्या निशाण्यावर आला आहे. विराटनं काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं आणि त्यात त्यानं दिवाळी कशी साजरी करायची, याबाबत टिप्स देणार असल्याची घोषणा केली. त्यानं लिहिलं की,''आपल्या आवडत्या व्यक्तिसोबत आणि कुटुंबीयांसोबत यंदाची दिवाळी कशी साजरी कराल, याबाबत मी तुमच्यासोबत एका मालिका शेअर करणार आहे. पाहायला विसरू नका.''
विराटनं या ट्विटसह व्हिडीओही पोस्ट केला आणि त्यात त्यानं म्हटलं की,''मागील एक दीड वर्ष हे जगातील सर्वांसाठी आव्हानात्मक ठरले, परंतु २०२१मध्ये भारतात जेव्हा कोरोनाची दुसरी लाट येऊन धडकली, त्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. आता आपण दिवाळी साजरी करण्यासाठी तयारी करत आहोत आणि मी तुमच्याशी काही टिप्स शेअर करणार आहे.''
विराटनं काही वर्षांपूर्वी फटाके न फोडता प्रदुषणविरहीत दिवाळी साजरं करण्याचं आवाहन केलं होतं. आताप्रमाणे त्याच्यावर तेव्हाही टिका झाली होती आणि फक्त हिंदू सणाच्या वेळेस सेलिब्रेटी ज्ञान पाजळतात, अशीही टीका केली गेली. आताही नेटिझन्सचा सूर असाच आहे.