Join us

चेंडूशी छेडछाड प्रकरण : हरभजनचा आयसीसीवर हल्लाबोल, भेदभाव करत असल्याचे केले आरोप

चूक मान्य केल्यावरही आयसीसीने स्मिथला एका सामन्यासाठी निलंबित केले आहे. पण त्याला केलेली ही शिक्षा फारच सौम्य असल्याचा आरोप भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 14:18 IST

Open in App
ठळक मुद्देऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आयसीसीने जी वागणूक दिली त्या गोष्टीला ' फेअर प्ले' म्हणायचं का?, हरभजनचा सवाल

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून बेनक्रॉफ्टने चेंडूशी छेडछाड केली. त्यानंतर ही आमची रणनिती होती, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने जाहीरही केले. चूक मान्य केल्यावरही आयसीसीने स्मिथला एका सामन्यासाठी निलंबित केले आहे. पण त्याला केलेली ही शिक्षा फारच सौम्य असल्याचा आरोप भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने केला आहे.

बेनक्रॉफ्टने केलेल्या कृत्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाने क्रिकेटला काळीमा फासली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांची क्रिकेट ऑस्ट्रेलियाने उचलबांगडी केली आहे. त्याचबरोबर आयसीसीने स्मिथला एका सामन्यासाठी निलंबित केले आहे, त्याचबरोबर त्याच्या मानधनातील 100 टक्के रक्कम दंड स्वरुपात कापली जाणार आहे.

हरभजनने आयसीसीवर हल्लाबोल करताना म्हटले आहे की, " वाह, आयसीसी वाह । ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आयसीसीने जी वागणूक दिली त्या गोष्टीला ' फेअर प्ले' म्हणायचं का? बेनक्रॉफ्टने चेंडूशी छेडछाड केली, त्याने ते मान्यही केलं. याबाबतचे पुरावेही आहेत. पण त्याला फारच कमी शिक्षा केली.  2001 साली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात भारताच्या सहा खेळाडूंना कोणताही पुरावा नसताना दोषी ठरवण्यात आले होते आणि कडक कारवाईही केली होती. "

हरभजन याबाबत पुढे म्हणाला की,  " ऑस्ट्रेलियामध्ये 2008 साली मंकी गेट प्रकरण झाले होते. त्या प्रकरणात मी दोषी म्हणून सापडलो नव्हतो. तरीही माझ्यावर तीन सामन्यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यामुळे या खेळाडूंवर आयसीसीने नेमका कोणता न्याय लावला, हे समजणे अनाकलनीय आहे. "

टॅग्स :हरभजन सिंगआयसीसीचेंडूशी छेडछाड