Join us  

भविष्यात घेण्यात येतील कठोर निर्णय; संघनिवडीसाठी लागणार कसोटी

संघातील स्थान टिकवण्यासाठी अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या अनुभवी खेळाडूंवर दबाव आले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 5:20 AM

Open in App

मुंबई : 'संघ निवडीबाबत संघ व्यवस्थापन भविष्यात काही कठोर निर्णय घेऊ शकेल,' असे सांगत खेळाडूंसह स्पष्ट चर्चा करणे महत्त्वाचे असल्याचे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले. सलामीवीर रोहित शर्माला न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विश्रांती देण्यात आली होती, तर कर्णधार कोहलीला पहिल्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली होती. प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांच्या या पहिल्या कसोटी मालिकेत श्रेयस अय्यर व मयांक अग्रवाल यांनी प्रत्येकी एक शतकी खेळी केली. यामुळे संघातील स्थान टिकवण्यासाठी अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या अनुभवी खेळाडूंवर दबाव आले आहेत.

न्यूझीलंडविरुद्ध मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर द्रविड म्हणाले की, 'युवा खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत आणि यामुळे संघ निवड करताना चांगलीच कसोटी लागणार आहे. प्रत्येकजण चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असून, प्रत्येक जण एकमेकांसाठी कठीण आव्हान निर्माण करत आहे. मला आशा आहे की, यामुळे आमची परीक्षा होईल आणि यामुळे आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. पण हे करत असताना खेळाडूंसोबत स्पष्ट संवाद असेल आणि असे निर्णय का घ्यावे लागले हे जेव्हा त्यांना समजावता येईल, तेव्हा काहीच अडचण होणार नाही.'

या मालिकेत एकतर्फी विजय मिळवल्याचे म्हणणे चुकीचे ठरेल, असे द्रविड म्हणाले. त्यांनी सांगितले की, 'विजेता म्हणून मालिकेची सांगता करणे चांगले ठरले. कानपूग़ येथेही आम्ही विजयाच्या समीप पोहोचलो होतो. पण, अखेरचा फलंदाज बाद करु शकलो नाही. येथे आम्ही कठोर मेहनत घेतली. निकाल भलेही एकतर्फी दिसत असला, तरी यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे.'

मिळालेल्या संधीचा फायदा घेण्यात खेळाडू तयार असल्याचे पाहून आनंद झाला. संघात काही वरिष्ठ खेळाडू नव्हते. पण, त्यांची जागा घेणाऱ्या खेळाडूंना श्रेय द्यावे लागेल. जयंतला रविवारी बळी घेण्यास झुंजावे लागले होते. पण त्याने त्यातून धडा घेतला आणि सोमवारी दमदार मारा करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. मयांक, श्रेयस, सिराज यांना फारशी संधी मिळाली नाही. अक्षरला गोलंदाजीसह फलंदाजीतही योगदान देताना पाहून आनंद झाला. यामुळे आता आमच्याकडे अनेक पर्याय निर्माण झाले असून, या जोरावर भक्कम संघ तयार करण्यास मदत होईल. - राहुल द्रविड

टॅग्स :राहुल द्रविडभारतन्यूझीलंड
Open in App