ठळक मुद्देऑस्ट्रेलियाच्या शेफिल्ड शिल्डमध्ये पुन्हा एकदा घबराट
सिडनी : तीन वर्षांपूर्वीची गोष्ट... तो मैदानात खेळायला उतरला होता... पण तोच त्याचा अखेरचा सामना असेल, हे कुणाच्या गावीही नसावे. नियतीचाच सारा खेळ. काही वेळ तो खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. पण असा एक उसळता चेंडू त्याच्या दिशेने आला आणि क्षणातच तो जमिनीवर कोसळला. तो चेंडू त्याच्यासाठी जीवघेणा ठरला होता. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फिल ह्युजची अधुरी एक कहाणी, साऱ्यांनाच चटका लावणारी. तीन वर्षांनंतर त्याच स्पर्धेत घबराट पसरवणारी तशीच एक घटना घडली. पण यावेळी दैव बलवत्तर होते, एवढंच.
ऑस्ट्रेलियाच्या शेफिल्ड शिल्डमधलीच ही गोष्ट. फिलला ज्याचा उसळता चेंडू लागला तोच सीन अॅबॅाट गोलंदाजी करत होता. फिलच्या मृत्यूनंतर अॅबॅाटला हादरा बसला होता. काही काळ तो या धक्क्यातून बाहेर आला नव्हता. अखेर काही क्रिकेटपटूंनीच अॅबॅाटशी संवाद साधला आणि तो या धक्क्यातून बाहेरच आला. त्याने पुन्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पण पुन्हा त्याच्या हातून तसाच एक बाऊन्सर टाकला गेला आणि पुन्हा एकदा तो फलंदाजाच्या डोक्यावर आदळला. हॅल्मेट होतेच. पण तरीही तो फलंदाज जमिनवर कोसळला. साऱ्यांना पुन्हा एकदा फिलची आठवण आली आणि मैदानातील साऱ्यांनीच त्याच्याकडे धाव घेतली. व्हिक्टोरीया संघाच्या वैद्यकीय चमूनेही लगेचच मैदानात धाव घेतली. काही क्षण कुणालाही काही कळत नव्हते. सारेच फिलसारखा अपघात होऊ नये, यासाठी देवाची करुणा भाकत होते. धावत धावत सारेच व्हिक्टोरीयाचा फलंदाज विल पुकोवस्कीकडे पोहोचले. अॅबॅाटच्या मनात पुन्हा एकदा धस्स झालं. आपण काय करावं, हे त्याला कळत नव्हतं. त्याचे पाय आपसूकच पुकोवस्कीच्या दिशेने वळले. पुकोवस्की मैदानात पडलेला होता. अॅबॅाट आणि एका सहकाऱ्याने त्याला उठवून बसवले. नेमकं काय होतंय, हे विचारत त्याला आधार देण्याचा प्रयत्न केला. व्हिक्टोरीयाचा वैद्यकीय संघ तोपर्यंत पुकोवस्कीकडे पोहोचला होता. त्यांनी काही तातडीचे उपचार केले. पण पुकोवस्कीचे डोके काहीसे बधीर झाले होते. मला खेळता येणार नाही, असे त्याने सांगितले आणि वैद्यकीय संघाने त्याला पेव्हेलियनमध्ये घेऊन जाण्याची तजवीज केली.
पुकोवस्की तातडीने उपचार करायला सुरुवात केली. दोन तास त्याला अंधाऱ्या खोलीत ठेवण्यात आले. अजूनही त्याचे डोके ठणकते आहे, असं संघ व्यवस्थापनाने सांगितले खरे, पण अॅबॅाटचा जीव कासावीस होता. अखेर काही वेळाने पुकोवस्की बाहेर आल्याचे त्याला दिसले आणि त्याचा जीव भांड्यात पडला.