Join us
Daily Top 2Weekly Top 5

तिलक झोपतानाही बॅट-बॉल शेजारी ठेवायचा; वडिलांनी सांगितले मुलाच्या क्रिकेटवेडाचे किस्से

हैदराबादच्या २० वर्षांच्या तिलक वर्माने विंडीजच्या गोलंदाजांची धुलाई केल्यानंतर त्याचे वडील नंबूरी नागराजू यांनी त्याच्या क्रिकेट प्रेमाची माहिती दिली. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 06:02 IST

Open in App

हैदराबाद : डावखुऱ्या तिलक वर्माने टीम इंडियात जोरदार पदार्पण केले. टी-२० त तिलकने विंडीजच्या गोलंदाजांना चांगलेच चोपून काढले. तिलकचे अनेकांनी कौतुक करीत तो पुढच्या काळात युवराजसिंग याची भूमिका पार पाडणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.  आगामी विश्वचषकापूर्वी भारताला धडाकेबाज फलंदाज मिळाल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. हैदराबादच्या २० वर्षांच्या तिलक वर्माने विंडीजच्या गोलंदाजांची धुलाई केल्यानंतर त्याचे वडील नंबूरी नागराजू यांनी त्याच्या क्रिकेट प्रेमाची माहिती दिली. 

नागराजू हे इलेक्ट्रिशियन आहेत. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘तिलकला बालपणापासून क्रिकेटची आवड आहे. नेहमी बॅट घेऊन क्रिकेटमध्ये मोठा खेळाडू बनण्याचे स्वप्न त्याने पाहिले होते.  तो लहान असताना आम्ही त्याला प्लास्टिकची बॅट खरेदी करून दिली. त्यानंतर तिलक झोपताना बॅट आणि बॉल शेजारी ठेवत असायचा.’ गुणवत्ता, कठोर परिश्रम आणि कुटुंबाच्या अतुलनीय पाठिंब्याच्या जोरावर तिलकने मोठे यश मिळविल्याचे नागराजू यांनी म्हटले आहे.

‘प्रशिक्षकांनी अभ्यासात मागे पडू दिले नाही’ तिलकच्या यशामागे बालपणीचे प्रशिक्षक सलाम बायश यांचा हात असल्याचेही नागराजू यांनी आवर्जून सांगितले. ते म्हणाले, ‘सलाम सर हे तिलकला गॉडफादरसारखे आहेत.

  क्रिकेटच्या गोष्टी, किट आणि अन्य बाबींमध्ये त्यांनी नेहमीच तिलकला मदत केली. सलाम सरांनी तिलकला नेहमीच प्रोत्साहन देण्याचं काम केलं. 

  क्रिकेट खेळताना त्यांनी तिलकला अभ्यासातही मागे पडू दिले नाही. ज्यावेळी त्याला पैशांची आवश्यकता होती, तीदेखील सलाम सरांनी पूर्ण केली.’ सलाम सरांच्या मार्गदर्शनाखाली तिलक देशाचे नाव आणखी उंचावणार असल्याचा विश्वास  नागराजू यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ
Open in App