ठळक मुद्देचितगाव येथे खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यादरम्यान, काही जणांना अटकअटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये तीन भारतीय नागरिकांचाही समावेशया लोकांना स्टेडियममध्ये जुगार खेळल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे
ढाका/नवी दिल्ली - बांगलादेश आणि वेस्ट इंडिजमध्ये चितगाव येथे खेळली गेलेली कसोटी ऐतिहासिक ठरली. काल आटोपलेल्या या कसोटीत वेस्ट इंडिजने ३९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत जबरदस्त विजय मिळवला. मात्र या कसोटी सामन्यादरम्यान, स्टेडियममधून काही लोकांना अटकही करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये तीन भारतीय नागरिकांचाही समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चितगाव येथे खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यादरम्यान, काही जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये तिघेजण भारतीय आहेत. या लोकांना स्टेडियममध्ये जुगार खेळल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मिळच असलेल्या वृत्तानुसार हे सर्वजण आंतरराष्ट्रीय जुगारी आहेत. त्यांना स्टेडियमच्या मेन गेटवरून अटक करण्यात आली. सुनील कुमार, चेतन शर्मा आणि सन्नी मघू अशी अटक करण्यात आलेल्या भारतीय नागरिकांची नावे आहेत. या लोकांकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनमधून गॅम्बलिंगचे व्हिडिओ सापडले आहेत.
वेस्ट इंडिजचा ऐतिहासिक विजय
बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या चितगाव कसोटीत वेस्ट इंडिजने ऐतिहासिक विजय मिळवला होता. काइल मेयर्स याने पदार्पणातच केलेली द्विशतकी खेळी आणि त्याने नक्रुमाह बोन्नर (८६) याच्यासोबत चौथ्या विकेटसाठी केलेली द्विशतकी भागीदारी वेस्ट इंडिजच्या विजयात निर्णायक ठरली होती. ही भागीदारी वेस्ट इंडिजसाठी चौथ्या डावात कुठल्याही विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे. दरम्यान, बांगलादेशविरुद्ध वेस्ट इंडिजने केलेला ३९५ धावांचा पाठलाग हा कसोटी क्रिकेटमधील आशिया खंडातील सर्वात मोठा आणि कसोटी क्रिकेटमधील पाचवा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग ठरला आहे.