England vs India 1st Test Day 2: लीड्सच्या हेडिंग्लेच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाचा पहिला डाव ४७१ धावांत आटोपला आहे. शुबमन गिल आणि रिषभ पंत या जोडीनं ३ बाद ३५९ धावांवरुन दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. रिषभ पंतच्या रुपात या कसोटी सामन्यात टीम इंडियाला तिसरा शतकवीर मिळाला. पण ढग दाटून आले अन् टीम इंडियानं सेट केलेले वातावरणच बदलले. कर्णधार शुबमन गिलनं विकेट गमावल्यावर ठराविक अंतराने भारतीय संघाने अल्प धावसंख्येत सर्वच्या सर्व विकेट गमावल्याचे पाहायला मिळाले.'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गिल आणि रिषभ पंतची विकेट पडली अन् इंग्लंडनं कॅमबॅकची संधी साधली
कर्णधार शुबमन गिल आणि उप कर्णधार रिषभ पंत जोडीनं ७१ धावांची भागीदारी रचत नव्या दिवसाची सुरुवातही दमदार केली. रिषभ पंतनं आपल्या कसोटी कारकिर्दीतील ७ वे शतकही झळकावले. शुबमन गिल शोएब बशीरच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. त्याने २२७ चेंडूत १९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १४७ धावांची खेळी केली. त्याची जागा घेण्यासाठी आलेलल्या करुण नायरला तर बेन स्टोक्सनं खातेही उघडू दिले नाही. टंगनं अप्रतिम इनस्विंग चेंडूवर रिषभ पंतला पायचित केले. तो १७८ चेंडूत १२ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने १३४ धावा करून माघारी फिरला. गिल आणि रिषभ पंतनंतर एकाही भारतीय बॅटरला मैदानात तग धरता आला नाही. या दोघांची विकेट पडल्यावर इंग्लंडनं कमबॅकची संधी साधली.
टीम इंडियानं ४१ धावांत गमावल्या ७ विकेट्स
शुबमन गिलची विकेट पडली त्यावेळी भारतीय संघाच्या धावफलकावर ४३० धावा लागल्या होत्या. त्यानंतर करुण नायरकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. पण तो खातेही न उघडता माघारी फिरला. रविंद्र जडेजाने दुहेरी आकडा गाठला. पण तोही फार काळ मैदानात टिकला नाही. जडेजाने १५ चेंडूत केलेल्या ११ धावा वगळता शार्दुल ठाकूर १ धाव करून तंबूत परतला. जसप्रीत बुमराहला तर खातेही उघडता आले नाही. प्रसिद्ध कृष्णाची विकेट घेत टंगनं टीम इंडियाचा पहिला डाव ४७१ धावांत आटोपला. पहिल्या डावात तीन शतकवीर दिसले, पण टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाच्या खेळात अवघ्या ४१ धावांत ७ विकेट्स गमावल्या. इंग्लंडकडून जोश टंग आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी ४-४ विकेट्स घेतल्या. ब्रायडन कार्स आणि बशीरनं आपल्या खात्यात प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.