वर्षाच्या अखेरीस क्रिकेटच्या मैदानात कसोटी मालिकेचा महोत्सव पाहायला मिळतोय. एका बाजूला भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा थरार सुरु आहे. दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने या दोन्ही कसोटी मालिका महत्त्वपूर्ण आहेत. याशिवाय झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातही दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. क्वीन्स स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात रंगलेल्या कसोटी सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाने विक्रमी धावसंख्या उभारुन क्रिकेट जगतात एक वेगळी छाप सोडून लक्षवेधून घेतले आहे.
झिम्बाब्वेनं सेट केला सर्वोच्च धावसंख्येचा नवा विक्रम
झिम्बाब्वेच्या संघानं अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात ५८६ धावांसह कसोटीच्या आतापर्यंतच्या इतिहासातील आपली सर्वोच्च धावंसख्या उभारली आहे. या सामन्यात संघातील तिघांच्या भात्यातून शतकी खेळी आल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस अफगाणिस्तानच्या संघानं ९५ धावांवर २ विकेट्स गमावल्या होत्या. पाहुण्या संघासमोर विक्रमी धावसंख्या उभारण्यात झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एर्विनसह सीन विलियम्स आणि ब्रायन बेनेट यांनी शतकी खेळीसह महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सहाव्यांदा उभारली ५०० प्लस धावसंख्या
अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात ५०० पेक्षा अधिक धावांसह झिम्बाब्वेच्या संघानं खास षटकार ठोकला. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी सहाव्यांदा ५०० पेक्षा अधिक धावा केल्या. याआधी ५६३ ही झिम्बाब्वेची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या होती. २००१ मध्ये त्यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध ही कामगिरी नोंदवली होती. हा सामना अनिर्णित राहिला होता. १९९५ ते २००५ या कालावधीत झिम्बाब्वेनं पाच वेळा पाचशे प्लस धावा केल्याचे पाहायला मिळाले होते. पण त्यानंतर झिम्बाब्वेचा संघ कसोटीत खूपच मागे पडला. २३ वर्षांनी झिम्बाब्वेनं आपला कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड मोडीत काढत नवा विक्रम सेट केला आहे.
या तिघांनी झळकावली शतके
अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धावफलकावर अवघ्या ४३ धावा असताना झिम्बाब्वेच्या संघाला पहिला धक्का बसला. जॉयलॉर्ड गम्बी ९ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार क्रेग एर्विन, सीन विलियम्स आणि ब्रायन बेनेट यांनी शतकी खेळी करत संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. सीन विलियम्स याने झिम्बब्वेकडून सर्वाधिक १५४ धावांची खेळी केली. क्रेग एर्विन याने १०४ धावांची तर ब्यान बेनेट याने ११० धावांची नाबाद खेळी केली.