विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी भारतीय क्रिकेटपटूंमधील वाढत्या दुखापतींसंदर्भात चिंता व्यक्त करत, यासाठी व्यस्त कॅलेंडरला जबाबदार ठरवले आहे, ज्यात खेलाडू वर्षातीत जवळपास दहा महिने खेळत असतात. तसेच, बेंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी आजकाल खेळाडूंसाठी रिहॅबिलिटेशनचे केंद्र बनले आहे. तेथे खेळाडू सरावापेक्षा रिकव्हरीतच अधिक वेळ घालवत आहेत. या मालिकेतील ताजे नाव म्हणजे, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह. बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे सिडनी येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटीतून बाहेर पडला होता.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या प्राथमिक संघात समावेश होऊनही, बुमराहला अंतिम संघातून वगळण्यात आले. दुखापतीमुळे मोहम्मद शमी १४ महिने बाहेर होता. 1983 विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव दिल्ली येथे टाटा स्टील गोल्फ पुरस्कार वितरण समारंभाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी, "मला चिंता एवढीच आहे की, ते वर्षातील दहा महिने खेळत आहेत," असे कपिल म्हणाले.
यावेळी, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बुमराहची कमतरता जाणवेल? असे विचारले असता, कपिल यांनी खेळाडूंना दुखापतग्रस्त खेळाडूंवर अवलंबून राहण्या ऐवजी एकमेकांना सहकार्य करण्यावर फोकस करण्याचा सल्ला दिला.
ते म्हणाले, ‘‘अशा खेळाडूसंदर्भात कशासाठी बोलायचे, जो संघातच नाही. हा संघाचा खेळ आहे आणि संघाला जिंकायचे आहे. एखाद्या व्यक्तीला नाही. हे बॅडमिंटन, टेनिस अथवा गोल्फ नाही. हे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघ म्हणून भाग घेत आहेत. जर आपण संघ म्हणून खेळलो तर नक्कीच जिंकू.’’
कपिल पुढे म्हणाले, "आपले मुख्य खेळाडू दुखापतग्रस्त व्हावेत, असे आपल्याला कधीही वाटत नसते. मात्र तसे झाले तर आपण काहीही करू शकत नाही. भारतीय संघाला शुभेच्छा."चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेश विरुद्ध खेळला जाणार आहे. तसेच 23 फेब्रुवारीला त्यांचा सामना पाकिस्तान सोबत होणार आहे.