Join us

'हे शरियतच्या विरोधात...', मोहम्मद शमीच्या मुलीने होळी खेळल्याने मौलाना रझवी संतापले

काही दिवसांपूर्वीच मौलाना रझवींनी मोहम्मद शमीला उपवास न केल्याबद्दल सुनावले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 20:19 IST

Open in App

Mohammed Shami : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने रमजानमध्ये उपवास न केल्याबद्दल ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी त्याच्यावर निशाणा साधला होता. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे काही सामने रमजानच्या महिन्यात झाले आणि या सामन्यात खेळणाऱ्या शमीने उपवास केला नव्हता. यामुळे मौलानांनी त्याला गुन्हेगार ठरवले होते. आता याच मौलानांनी शमीच्या मुलीने होळी साजरी करणे 'बेकायदेशीर' आणि 'शरियतच्या विरोधात' असल्याचे म्हटले आहे. 

ऑल इंडिया मुस्लीम जमातचे अध्यक्ष मौलाना शाहबुद्दीन रझवी यांनी एक नवीन व्हिडीओ प्रसारित केला असून, त्यात मोहम्मद शमीच्या मुलीवर टीका केली आहे. रझवी म्हणाले, 'मोहम्मद शमीची मुलगी लहान आहे. जर तिने अजाणतेपणी होळी साजरी केली असेल, तर तो गुन्हा नाही. पण जर तिला समजत असेल आणि ती जाणूनबुजून होळी साजरी केली असेल, तर हा शरीयतनुसार गुन्हा आहे.' 

'शमीला यापूर्वीही इस्लामच्या तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला होता. तरीही त्याच्या मुलीचा होळी साजरा करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. मी शमी आणि त्याच्या कुटुंबीयांना आवाहन करतो की, जे शरियतमध्ये नाही, ते तुमच्या मुलांना करू देऊ नका. होळी हा हिंदूंचा मोठा सण आहे, त्यामुळे मुस्लिमांनी होळी साजरी करू नये. जर कोणी शरीयत माहीत असूनही होळी साजरी करत असेल, तर तो गुन्हा आहे,' अशी प्रतिक्रिया मौलाना रझवी यांनी दिली आहे.

मोहम्मद शमीवरही केलेली टीकाया महिन्याच्या सुरुवातीला मौलाना रझवींनी मोहम्मद शमीवर पवित्र रमजान महिन्यात उपवास न केल्याबद्दल टीका केली होती. 6 मार्च रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान शमीचा कोल्ड ट्रिंक्स पितानाचा फोटो समोर आल्यानंतर मौलनाने शमीला शरियतच्या दृष्टीने गुन्हेगार म्हटले होते. तसेच, शमीला शरियतचे नियम पाळण्याचा सल्लाही दिला होता. आता त्यांनी शमीच्या मुलीवर होळी खेळल्याबद्दल टीका केली आहे.

टॅग्स :मोहम्मद शामीऑफ द फिल्डरमजानहोळी 2025